घोन्सात वेकोलिने घातला नैसर्गिक नाल्यावरच घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 05:00 AM2022-06-05T05:00:00+5:302022-06-05T05:00:25+5:30
घोन्सा गावाजवळून वाहणारा नाला हा फुलोरा (उजाड) व घोन्सा शिवेमधून येतो. फुलोरा तलावाचे पाणी या नाल्याद्वारे थेट वर्धा नदीत पोहोचते. मात्र अलीकडेच वेकोलिने घोन्सा खुल्या खाणीतील मातीचा ढिगारा या नाल्यावर टाकल्याने हा नालाच बंद झाला आहे. यासंदर्भात घोन्सा ग्रामपंचायतीने १ जूनला थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वेकोलिने नाला बंद करताना त्याचा प्रवाह एका बाजूने वळता करून तो थेट विदर्भा नदीपर्यंत नेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील घोन्सा येथील खुल्या कोळसा खाणीत वेकोलिने अक्षरश: मनमानी सुरू केली आहे. यामुळे परिसरातील गावकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अलीकडेच वेकोलिने घोन्सा बायपासजवळून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावरच मातीचा मोठा ढिगारा उभा केल्याने पावसाळ्यात नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडून पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. यासंदर्भात घोन्सा ग्रामपंचायतीने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आता वणीचे तहसीलदार निखिल धूळधर या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
घोन्सा गावाजवळून वाहणारा नाला हा फुलोरा (उजाड) व घोन्सा शिवेमधून येतो. फुलोरा तलावाचे पाणी या नाल्याद्वारे थेट वर्धा नदीत पोहोचते. मात्र अलीकडेच वेकोलिने घोन्सा खुल्या खाणीतील मातीचा ढिगारा या नाल्यावर टाकल्याने हा नालाच बंद झाला आहे. यासंदर्भात घोन्सा ग्रामपंचायतीने १ जूनला थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वेकोलिने नाला बंद करताना त्याचा प्रवाह एका बाजूने वळता करून तो थेट विदर्भा नदीपर्यंत नेला. त्यामुळे पावसाळ्यात विदर्भा नदीचे पात्र फुगून ते पाणी थेट घोन्सा व इतर गावात शिरण्याची भीती व्यक्त केली आहे. यासंदर्भात वणीचे तहसीलदार निखिल धूळधर यांनी प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पाहणी केली व तलाठ्यांमार्फत चौकशीचा अहवाल मागविला. त्यात वेकोलिवर ठपका ठेवण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने मोठ्या तीव्रतेचे स्फोट या कोळसा खाणीत घडविण्यात येत आहेत. त्यामुळे गावांना हादरे बसतच आहेत, सोबतच बारूदीचा धूर गावात शिरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि मनमानीपणे स्फोट घडवित आहे. त्यानंतर आता नाला बंद करून गावकऱ्यांपुढे नवे संकट उभे केले आहे.
अनुचित घटना घडल्यास वेकोलि जबाबदार
नाला बंद केल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्यास व त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी वेकोलि प्रशासन जबाबदार राहील, असे पत्रच तहसीलदारांनी वेकोलिला दिले आहे. पूर परिस्थिती टाळायची असेल, तर हा नाला पूर्ववत करावा, अशा सूचनाही तहसीलदारांनी पत्रातून वेकोलिला दिल्या आहे. आता वेकोलि कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.