११८३ कोटींच्या रस्त्यांत ‘पीडब्ल्यूडी’ची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:00 AM2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:39+5:30
मुंबईतील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ३१ मार्च २०१८ रोजी ११८३ कोटींच्या रस्ते बांधकामाचे कंत्राट मिळाले. मात्र गेल्या दहा महिन्यात या कंपनीने ग्रेड-१, ग्रेड-२ ची कामेही पूर्ण केलेली नाही. या कंपनीचे बांधकाम खात्यातील वरिष्ठांशी थेट मुंबई कनेक्शन असल्याने ही कंपनी प्रादेशिक, जिल्हा व विभागस्तरीय अभियंत्यांना जुमानत नाही. उलट त्यांची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले जाते. वेळेत काम न करणाऱ्या या कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र मुंबई कनेक्शनमुळे त्यालाही विलंब लागत असल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुसद विभागातील ११८३ कोटींच्या रस्ते बांधकामाचे कंत्राट मिळालेल्या ईगल कन्स्ट्रक्शनकडून केवळ कामाच्या गतिमानतेचा देखावा निर्माण केला जात आहे. या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांचीसुद्धा चक्क दिशाभूल केली जात आहे.
मुंबईतील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ३१ मार्च २०१८ रोजी ११८३ कोटींच्या रस्ते बांधकामाचे कंत्राट मिळाले. मात्र गेल्या दहा महिन्यात या कंपनीने ग्रेड-१, ग्रेड-२ ची कामेही पूर्ण केलेली नाही. या कंपनीचे बांधकाम खात्यातील वरिष्ठांशी थेट मुंबई कनेक्शन असल्याने ही कंपनी प्रादेशिक, जिल्हा व विभागस्तरीय अभियंत्यांना जुमानत नाही. उलट त्यांची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले जाते. वेळेत काम न करणाऱ्या या कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र मुंबई कनेक्शनमुळे त्यालाही विलंब लागत असल्याचे सांगितले जाते.
ईगल कन्स्ट्रक्शनने कंत्राट मिळालेल्या मार्गांवर मेन्टेन्सची कामे केली नाहीत. स्वत: मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंत्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन या कामांची पाहणी केली. त्यानंतर कंत्राटदाराला पाचारण केले गेले. तेव्हा त्यांनी तत्काळ कामे करण्याची हमी दिली. त्यासाठी त्यांना ३० डिसेंबर २०१९ ची डेड लाईन देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ही कामे केली नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुसद विभागाला माळेगाव ते खडका आणि पुसद ते दिग्रस या शंभर किलोमीटर रस्त्यावरील देखभाल दुरुस्तीसाठी सव्वा कोटी रुपयांच्या सात कामांची निविदा काढण्याची वेळ आली. दरम्यान ईगल कन्स्ट्रक्शनने मजुरांच्या दोन ते तीन गँग बनवून थातूरमातूर कामे करण्याचा व त्याचे फोटो बांधकाम खात्याला सादर करण्याचा सपाटा सुरू केला. शेंबाळपिंपरी ते पुसद दरम्यान काही पॅचेस बुजविण्यात आले. धरसोड पद्धतीने जास्तीत जास्त लांबी कव्हर केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. सांडवा-मांडवा या भागात तर डांबरीरोडवरील खड्डे चक्क मुरुमाने भरले गेले. पुसद ते खडका फाटा या दरम्यान पॅचेसची कामेच केली गेली नाही. बाना ते फुना मार्गावर काही पॅचेस भरुन डागडुजी केली गेली. पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हाण फाट्यानजीक मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. मात्र तेथे पॅचेस केले गेले नाही. बांधकाम खात्याचा हस्तक्षेप होऊ नये, गतिमानता दिसावी व अधिक लांबी कव्हर झाल्याचे दाखविता यावे, एवढेचा प्रयत्न ईगल कन्स्ट्रक्शनकडून केला गेला. त्यासाठी चक्क बांधकाम अभियंत्यांच्या डोळ्यात धूळ फेक करण्यात आली. कंत्राट मिळालेल्या मार्गावरील काही रस्ते साडेपाच तर काही साडेसात मीटरचे आहे. त्यांना वाईंडींग-रुंदीकरण करून दहा मीटर बनविणे बंधनकारक आहे.
रस्त्याच्या दुतर्फा तीन-तीन मीटर खोदकाम करून तेथे ग्रेड-१, ग्रेड-२ करणे क्रमप्राप्त आहे. मात्र कंत्राटदाराने जेथे मुरुम उपलब्ध असेल तेथेच ही कामे केली. काळी जमीन असेल व मुरुम उपलब्ध नसेल तेथे ब्लँकेटींग केले गेले नाही. अर्थात दूरुन मुरुम आणावे लागेल ते तोट्याचे काम टाळले गेले. पुसद-दिग्रस मार्गावरील धुंदी घाटात रस्त्याच्या कडेला मुरुम उपलब्ध नसल्याने ब्लँकेटींग न केल्याचा हा प्रकार पहायला मिळतो. एकतर या कंपनीने एकाच वेळी दोन्ही बाजूंनी सर्व रोड खोदून ठेवल्याने वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे. त्यातून अपघात वाढत असून जीविताला धोकाही आहे.
दहा महिन्यांत चार व्यवस्थापक बदलले
ईगल कन्स्ट्रक्शनच्या एकूणच कारभाराबाबत ओरड आहे. मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने या प्रोजेक्टवर मॅनेजर टिकत नाही. गेल्या दहा महिन्यात चार मॅनेजर बदलल्याची माहिती आहे. या कंपनीने किरायाने मशीन घेऊन संपूर्ण मार्गावर खोदकाम केले. मात्र त्यातील अनेकांना वेळीच पैसे न मिळाल्याने ते आपल्या मशीन घेऊन निघून गेल्याचे सांगितले जाते. यावरून या कंपनीच्या व्यवहाराची कल्पना येते. बांधकाम अभियंत्यांनीही या कंपनीची मुजोरी आता खपवून घेऊ नये, असाच कनिष्ठ यंत्रणेचा सूर आहे.
वरिष्ठ अभियंत्यांची मोका पाहणी हवी
ईगल कन्स्ट्रक्शन कंपनी स्थानिक पातळीवर बांधकाम अभियंत्यांना जुमानत नाही. त्यांच्या बैठकीमध्ये सुसंगत उत्तर देणे, सहकार्य करणे टाळले जाते. चर्चा होत असताना, अभियंते जाब विचारत असताना कंत्राटदार दुसरीकडेच बिझी राहत असल्याचे सांगितले जाते. एकूणच ११८३ कोटींच्या या कंत्राटात ईगल कन्स्ट्रक्शनने खरोखरच किती किलोमीटर लांबीचे खड्डे बुजविले, सलग काम कुठे झाले याबाबत सादर केलेल्या फोटोवर अवलंबून न राहता मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांनी मोका पाहणी करून वस्तूस्थिती शोधणे अपेक्षित आहे. ईगल कन्स्ट्रक्शनवर दंडात्मक कारवाईला लागणाºया विलंबाचे रहस्य गुलदस्त्यात आहे.