गुणवत्तेचा कणा मोडू नय एवढीच अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:50 PM2017-10-01T22:50:06+5:302017-10-01T22:50:34+5:30
अत्यंत गुणवान असूनही परिस्थितीने अडवून ठेवलेल्या एका गुणवान पोरीची ही दर्दभरी कहाणी आहे.
अविनाश खंदारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : अत्यंत गुणवान असूनही परिस्थितीने अडवून ठेवलेल्या एका गुणवान पोरीची ही दर्दभरी कहाणी आहे. तिच्या संघर्षाची सुरुवात होते उमरखेडसारख्या दुर्गम तालुक्यात अन् ती पोहोचते विद्येच्या माहेरघरात.. पुण्यात. पण नियती काही तिची पाठ सोडायला तयार नाही. घरातल्या दारिद्र्याला न जुमानता ती स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्यासाठी पुण्यात गेली पण अपघाताने तिला पुन्हा दवाखान्यात जखडून ठेवलेय. आॅपरेशन करायचे आहे, पण दहा लाखांची रक्कम हवी... या लेकीला, उद्याच्या भविष्याला देणार कुणी मदतीचा हात?
अपेक्षा संजय मुनेश्वर ही साखरा येथील कोरडवाहू तीन एकराच्या कास्तकाराची हुशार कन्या. ती चार वर्षांची होती तेव्हाच म्हणजे १९९७ मध्ये तिची आई प्रगती यांचा मृत्यू झाला. बालपणीच मोठा आघात झाला. वडील संजय यांनी शेतीत काबाडकष्ट उपसून एक मुलगी आणि दोन मुलांचे शिक्षण केले. मोठा मुलगा वैभवच आता शेती पाहू लागला. पण संकटं संपलेली नव्हती. शेतीत काहीच पिकेना. शेवटी हताश वैभवने २०१४ मध्ये आत्महत्या केली. आईनंतर भावाचेचही असे निघून जाणे अपेक्षासाठी मोठे धक्कादायक ठरले. पण लवकरच ती सावरली. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून संकटांना नमवू लागली.
उमरखेडच्या गो. सी. गावंडे महाविद्यालयात बीएससी झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अपेक्षा पुण्यातील सदाशिव पेठेतील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत दाखल झाली. अपेक्षाला तिथे पाठविण्याएवढी घरची परिस्थिती नाहीच. पण तिची हुशारी पाहून गोंदियाची मैत्रिण मौसमी कटरे हिनेच अपेक्षाच्या राहण्याची व्यवस्था केली. शिक्षणासाठी तिनेच मदत केली. आता केवळ अभ्यास करणे, परीक्षा देणे, अधिकारी होणे एवढेच ध्येय जवळ दिसू लागले होते. पण पुन्हा नियतीने खोडा घातला.
५ सप्टेंबरला मैत्रिणीसोबत दुचाकीवर जात असताना गाडी स्लिप झाली आणि अपेक्षाला गंभीर दुखापत झाली. पाठीचा कणा पूर्णपणे मोडून गेला. छात्रीच्या हाडांचीही मोडतोड झाली. त्याही अवस्थेत मैत्रीणच धावून आली. मौसमीने अपेक्षाला तातडीने खेड येथील शिवापूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी आॅपरेशनकरिता १० लाखांचा खर्च सांगितला आहे. घरी पैशांची काहीच तजविज नाही. मौसमीने सोशल मिडियातून मदतीची मागणी केली. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी धावून आले. त्यांनी आपापसात वर्गणी करून २ लाख गोळाही केले. गेल्या महिन्याभरातील उपचार या पैशांतूनच सुरू आहे. आता कोणत्याही अवस्थेत ५ आॅक्टोबरला आॅपरेशन करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उमरखेड तालुक्याच्या या हुशार विद्यार्थिनीसाठी जिल्ह्यातील दानशूर माणसांनी पुढे यावे, एवढीच अपेक्षा!
मौसमी बनली अपेक्षाची सावली
महिनाभरापासून दवाखान्यात असलेल्या अपेक्षाला आई नाही. पण मौसमी नावाच्या मैत्रिणीने तिला आईची कमतरता भासू दिलेली नाही. ती दररोज तिची सेवासुश्रृशा करतेय. रात्रन्दिवस सावलीसारखी ती अपेक्षासोबत आहे. सतत सोशल मिडियातून मदतीचे आवाहनही करत आहे. मैत्रीचे नाते अबाधीत ठेवण्यासोबतच एका होतकरू मुलीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी तिची धडपड आहे. तिला समाजातील दानशूरांनी हातभार लावणे गरजेचे आहे.