अमेरिका रिटर्न नवरदेवासह नवरीला केले क्वॉरंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:25+5:30
अमेरिकेतील बोस्टन प्रांतात नोकरीला असलेल्या वराचा विवाह यवतमाळात गुपचूप पार पडला. त्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती दिली नव्हती. आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी या कुटुंबाकडे भेट दिली. विदेशातून आलेल्या वराला आणि वधूला होम क्वारंटाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विदेशातून येऊन जिल्हा प्रशासनाला सूचना न देता यवतमाळात लग्न करणाºया एका वरासह वधूला शुक्रवारी आरोग्य यंत्रणेने क्वारंटाईन केले. जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना आणखी कठोर करण्यात आल्या आहेत. सील केलेल्या तेलंगणा सीमेवर प्रवाशांची तपासणी कशी सुरू आहे, याची शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाहणी केली.
दरम्यान, जिल्ह्यात होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना संशयितांची संख्या १३० वर पोहोचली आहे. विलगीकरण कक्षातील दोघांची सुटका झाली असली तरी त्यांना पुढील १४ दिवस क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. तीन पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
अमेरिकेतील बोस्टन प्रांतात नोकरीला असलेल्या वराचा विवाह यवतमाळात गुपचूप पार पडला. त्याने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती दिली नव्हती. आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी या कुटुंबाकडे भेट दिली. विदेशातून आलेल्या वराला आणि वधूला होम क्वारंटाईन करण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली. तेलंगणा सीमा सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शुक्रवारी या ठिकाणी वाहनांची तापासणी करण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी स्वत: या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
संसर्ग टाळण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील केश कर्तनालय, गेम पार्लर, मनोरंजन केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच मंदिर, मशिद, गुरूद्वारा, गिरीजाघर, बुद्धविहार आणि इतर धार्मिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक नागरीक एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. हॉटेल, ढाबा, बेकरी, स्विट मार्ट, चाट भंडार या ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश आहे. दोन टेबलमधील अंतर तीन फुट असावे. एका टेबलवर दोन ते तीन जणांचीच व्यवस्था करण्याच्या सूचना आहेत. हॉटेलमध्ये सॅनिटायझर, साबन अथवा हँडवॉश ठेवण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यातील बँक, पोस्ट आॅफिसमध्ये प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना आहेत. कामकाज चालू असलेल्या ठिकाणी एकावेळी एकच ग्राहक येण्याच्या सूचना आहेत. सर्व खासगी वाहने, ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना नेऊ नये अशा सूचना आहेत. त्याचप्रमाणे प्रवाशांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचे आदेश आहेत. परदेशातून आलेल्यांनी स्वत:हून नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.