राज्यातील साडेआठशे शाळांच्या ‘अस्तित्वा’वर लागणार फुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:22 AM2017-12-04T10:22:02+5:302017-12-04T10:25:22+5:30

राज्यात तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस क्रमांकच नसल्याची गंभीर बाब महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या निदर्शनास आली आहे.

Question mark on existence of 850 schools in state | राज्यातील साडेआठशे शाळांच्या ‘अस्तित्वा’वर लागणार फुली

राज्यातील साडेआठशे शाळांच्या ‘अस्तित्वा’वर लागणार फुली

Next
ठळक मुद्दे२६७ शाळा बंद होणार यू-डायस क्रमांकासाठी धावाधाव

अविनाश साबापुरे।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : राज्यात तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस क्रमांकच नसल्याची गंभीर बाब महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या निदर्शनास आली आहे. यू-डायस क्रमांक नसलेल्या या शाळा शंभर टक्के अनधिकृत नसल्या तरी शिक्षण विभागाच्या दृष्टिकोनात त्या अस्तित्वहीन झाल्या आहेत. कोणतीही योजना राबविताना या शाळांचा विचार केला जात नाही. विशेष म्हणजे, यातील २६७ शाळांना आता यू-डायस क्रमांकही नाकारण्यात आल्याने त्या बंद होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील प्रत्येक शाळेला यू-डायस क्रमांक (युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन) घेणे बंधनकारक केले आहे. हा क्रमांक असलेल्या शाळांची संख्या विचारात घेऊनच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे प्रधान सचिव नंदकुमार यांनी प्रत्येक शाळेने यू-डायस क्रमांक मिळविण्याचे आदेश ७ आॅगस्ट रोजी दिले होते. विशेष म्हणजे, हा क्रमांक घेण्याची पद्धतीही सोपी करण्यात आली होती. १५ सप्टेंबरपूर्वी यू-डायस न घेतल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
या आदेशाने राज्यातील संस्था चालकांचे धाबे दणाणले. अंतिम मुदत उलटून गेल्यावरही तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस नसल्याची बाब उघड झाली. या शाळांनी आॅनलाईन क्रमांक मिळविण्याची धडपड केली. मात्र, त्यातील २६७ शाळांना शिक्षणाधिकारी स्तरावरूनच झिडकारण्यात आले. ‘रिजेक्ट’ झालेल्या या शाळा सुरूच राहिल्यास संबंधित संस्थाचालकावर कायदेशिर कारवाई सुरू करण्याचे आदेश शिक्षण सचिवांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.


राजधानीतच सर्वाधिक फसवाफसवी
यू-डायस क्रमांक न घेताच कारभार करणाऱ्या सर्वाधिक ३०४ शाळा मुंबईमध्ये आढळल्या आहेत. शैक्षणिक माहेरघर अशी ओळख मिळविलेल्या शहरांमधील संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणात फसवाफसवी करत शाळा चालविल्याचे दिसते. कारण पुण्यात १९० तर औरंगाबादमध्ये १६७ इतक्या मोठ्या संख्येतील शाळांकडे यू-डायस क्रमांकच नाही. राजधानी जवळच असलेल्या ठाणे, रायगड, पालघरसारख्या जिल्ह्यात तब्बल ४७८ शाळा शिक्षण विभागाच्या दफ्तरी नोंदणीकृत नाहीत.

जिल्हानिहाय बंद होणाऱ्या शाळा
शिक्षणाधिकाऱ्यांनी यू-डायस क्रमांक नाकारल्याने राज्यात २६७ शाळा बंद होणार आहेत. त्यांची जिल्हानिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे. नागपूर ३, अकोला १, अमरावती १, वर्धा ३, औरंगाबाद १५, बिड १६, जळगाव ३, जालना ११, कोल्हापूर १६, लातूर १, मुंबई ३८, नंदूरबार २, नाशिक १६, उस्मानाबाद ३, पालघर ६०, परभणी ३, पुणे ९, नत्नागिरी ९, सातारा १ सिंधुदुर्ग २, सोलापूर ३, ठाणे ५१. विशेष म्हणजे, यात विदर्भातील केवळ ६ शाळांचा समावेश असून यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशीम जिल्ह्यातील एकही शाळा यू-डायसविना बंद होण्याची शक्यता नाही.

Web Title: Question mark on existence of 850 schools in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.