वणीच्या उपजिल्हा रूग्णालयाचा प्रश्न मार्गी; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिले लेखी आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 01:40 PM2024-06-13T13:40:23+5:302024-06-13T13:40:46+5:30
मनसे नेते राजु उंबरकर यांनी घेतली भेट
वणी (यवतमाळ): गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या वणी उपजिल्हा रूग्णालयाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांनी मंगळवारी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन उपजिल्हा रूग्णालय सुरू करण्याची मागणी केली. त्यावर आरोग्य मंत्र्यांनी वणीचे उपजिल्हा रूग्णालय तात्काळ सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले.
वणी विधानसभा क्षेत्रात वणी उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात येण्यासाठी मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी आंदोलन, पत्र व्यवहार करून मागणी केली होती. या मागणीला आता मोठे यश आले आहे. याठिकाणी लवकरच उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीचे पत्र मनसे नेते राजू उंबरकर यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना दिले. त्याची तत्काळ दखल घेत सावंत यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देणार असून हे रुग्णालय लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले.
वणी परिसरात दगडी कोळसा, डोलामाईट, लाईमस्टोन यासारख्या खनिज संपत्तीच्या मोठमोठ्या खाणी आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. या दरम्यान सातत्याने अपघात होतात. या खाणींमुळे सर्वच प्रकारच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांना अनेक व्याधी जडत आहेत. त्यामुळे येथे उपजिल्हा रूग्णालय होणे अत्यावश्यक असल्याची बाब उंबरकर यांनी ना.सावंत यांना सांगितली. अत्यावश्यक आरोग्य सेवा नसल्याने बहुतांश रुग्णांना चंद्रपूर, नागपूर किंवा वर्धा या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठवावे लागते, ही बाबदेखील निदर्शनास आणून देण्यात आली. ही समस्या लक्षात घेता, तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन तेथे सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी उंबरकर यांनी केली. शासन स्तरावरून येत्या काही दिवसातच उपजिल्हा रूग्णालयाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती उंबरकर यांनी दिली.