साखर कारखान्याच्या जुन्या कामगारांचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: April 8, 2016 02:24 AM2016-04-08T02:24:40+5:302016-04-08T02:24:40+5:30
तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा ताबा नॅचरल शुगर कंपनीने घेतला आहे.
नॅचरल शुगरचा ताबा : कामगार आणि कुटुंब सैरभैर
महागाव : तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा ताबा नॅचरल शुगर कंपनीने घेतला आहे. हा कारखाना सुरू होणार म्हणून जुन्या कामगारांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली. परंतु अद्यापही एकाही जुन्या कामगाराला कारखान्यावर घेतले नाही. त्यामुळे जुन्या कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना राज्य बँकेने नुकताच विकला. हा कारखाना नॅचरल शुगर कंपनीने विकत घेतला. कारखाना सुरू होणार असल्याने जुन्या कामगारांच्याही आशा पल्लवीत झाल्या. मात्र या कारखाना प्रशासनाने उस्मानाबादवरून कामगार आणले आहे. या कामगारांची राहण्याची व्यवस्था गुंज वसाहतीत करण्यात आली. त्यामुळे पूर्वी येथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान खाली करून घेण्यासाठी सक्ती होवू लागली. या सर्व कामगारांनी नॅचरल शुगर कंपनीच्या चेअरमनकडे कामावर सामावून घेण्याची मागणी केली. आम्ही कारखाना निर्मितीपासून अल्प पगारावर कामावर आहोत. कुटुंबाचे हाल होत आहे. उपासमारीची पाळी आली आहे, असे कामगारांनी सांगितले. त्यातच नॅचरल शुगरने कर्मचारी भरती सुरू केल्याने जुने कर्मचारी हादरून गेले. अनुभव असूनही रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे.
ऊस उत्पादकांना न्याय मिळावा, बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पुष्पवंती साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर पुष्पवंतीचे नामकरण सुधाकरराव नाईक करण्यात आले. आता हा फलक येथील राजकारण्यांच्या अपयशामुळे पुसला गेला. हा कारखाना प्रा.लि. कंपनीने विकत घेतला आणि त्यांचा स्वतंत्र कारभार सुरू झाला. यातच या कारखान्याच्या भविष्याची झलक दिसत आहे. त्यांना येथील कामगार आणि ऊस उत्पादकांचे देणे-घेणे नसून केवळ व्यापारी म्हणून ते आल्याचा सूर कामगारात दिसत आहे.
(शहर प्रतिनिधी)