वाकान, तिवरंगच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:38 AM2021-07-26T04:38:13+5:302021-07-26T04:38:13+5:30

फोटो महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग ...

The question of rehabilitation of Wakan, Tivarang is on the agenda | वाकान, तिवरंगच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

वाकान, तिवरंगच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

Next

फोटो

महागाव : पावसाळा सुरू झाला की, पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येतो. तो शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. तालुक्यातही वाकान, तिवरंग आदी गावांच्या पुनर्वसनाचे भिजत घोंगडे गेल्या १५ वर्षांपासून पडले आहे.

नदी, नाल्याच्या काठावरील पुराने वाहून जाणारी घरे व पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची संख्या अद्याप कमी करता आली नाही. तालुक्यात वाकान, तिवरंग गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न अनेक लोकप्रतिनिधींनी मार्गी लावण्याची ग्वाही दिली. पूरग्रस्तांना भूलथापा देऊन मते घेतली. मात्र, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही.

तालुक्यातील नदी व नाल्यामुळे बाधित होणाऱ्या १० गावांतील नागरिकांसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू आहे. अद्याप जागा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व पदाधिकारी या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे, दोन गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केवळ जुजबी कारणासाठी जिल्हा स्तरावर धूळ खात पडला आहे.

वाकान हे १,२०० लोक वस्तीच गाव २००५ मध्ये पुरामुळे बाधित झालं. ७६ कुटुंबे उघड्यावर आले. १३ जनावरे मृत्युमुखी पडली होती, तेव्हापासून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी थोडा पाठपुरावा केल्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांनी २३ ऑक्टोबर, २०१० रोजी पुनर्वसनाचा प्रस्ताव बोलावून घेतला. ३० नोव्हेंबर, २०१२ पर्यंत पुनर्वसनाचे कागदी घोडे सरकविण्यात आले. मात्र, २६० कुटुंब आजही रेड झोनमध्ये वास्तव्याला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सीमा सुनील राठोड यांनी दिली. केवळ येथील मोजणी शीट उपलब्ध नसल्यामुळे पुनर्वसनाचे घोडे अडले आहे.

तिवरंग हे दोन हजार ३२७ लोकसंख्येचे गाव आहे. गाव जवळच असलेल्या नाल्यामुळे वारंवार बाधित होते. मोठा पाऊस झाला की, १०० ते १५० घरे पाण्याखाली येतात. या रेड झोनमधील घरांचे कायम पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे तेथील सरपंच प्रा.जयश्री सुनील राठोड यांनी सांगितले. तेथील पुनर्वसनाचा प्रस्ताव नगररचना कार्यालयात धूळखात पडून आहे.

बॉक्स

नदी, नाले ठरत आहेत धोक्याचे

नदी, नाल्याला आलेल्या पुरामुळे पोहंडूळ, तिवरंग, भोसा, हिवरा संगम, कवठा, थार बुद्रुक, वाकोडी, करंजखेड, कासारबेळ, मोरथ, आनंदनगर आणि धनोडा अशी किमान दहा गावे आणि त्यामधील काही भाग पुराच्या वेढ्यामुळे बाधित होत असतो. या गावांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. मात्र, ही समस्या लालफीतशाहीत अडकली आहे.

Web Title: The question of rehabilitation of Wakan, Tivarang is on the agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.