घाटंजी येथील शासकीय वसतिगृहातील प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: August 25, 2016 01:47 AM2016-08-25T01:47:30+5:302016-08-25T01:47:30+5:30
येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रश्न ऐरणीवर आले आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय : आवश्यक सोयीसुविधांचा प्रचंड अभाव
घाटंजी : येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील प्रश्न ऐरणीवर आले आहे. संबंधित प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने या वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. भोजन व नाश्ता मिळत नसल्याने विद्यार्थी दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनातील वरिष्ठांचा या वसतिगृहातील समस्यांकडे कानाडोळा सुरू आहे. विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. शिवाय भोजन दर्जेदार मिळत नाही. नियमानुसार नाश्ता, चहा यासह भोजनामध्ये ठरवून दिलेले पदार्थ मिळत नाही. वसतिगृहाशी संबंधित काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही सहकार्य मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. दरम्यान, या वसतिगृहातील दोन स्वयंपाकी महिलांना कामावरून कमी करण्यात आले. भोजन दर्जेदार केल्याच्या कारणावरून त्यांना कमी केल्याचे सांगितले जाते. या महिलांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी आहे.
वसतिगृहातील अनागोंदीसंदर्भात तहसीलदार राजपुरे यांना मंगळवारी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद आणि विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले. याची दखल घेत तहसीलदार राजपुरे आणि नायब तहसीलदार गजभिये यांनी वसतिगृहाला भेट दिली. कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना वसतिगृह प्रशासनाला देण्यात आल्या. (प्रतिनिधी)