पैशासाठी कडक उन्हातही बँकांसमोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:25+5:30

शासनाने लॉकडाऊनच्या काळात अनेक योजनांमधून लाभाची घोषणा केली. लाभाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली का हे तपासण्यासाठी मंगळवारी बहुतांश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसमोर गर्दी पहायला मिळाली. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढण्यासाठी नागरिकांनी कडाक्याच्या उन्हात बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. नागरिकांची ही रांग अनेक बँकांच्या बाहेरपर्यंत गेली होती.

Queue for money in front of banks even in the heat sun | पैशासाठी कडक उन्हातही बँकांसमोर रांगा

पैशासाठी कडक उन्हातही बँकांसमोर रांगा

Next
ठळक मुद्देसंचारबंदीत गर्दी : वयोवृद्धांची संख्या अधिक, काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगला फाटा, पोलिसांना पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने दोन आठवड्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी वगळता मॉर्निंग वॉकलाही घराबाहेर निघण्यास मनाई आहे. असा प्रयत्न करणाऱ्या सुमारे शंभरावर लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परंतु मंगळवारी यवतमाळ शहर व जिल्हाभर अनेक बँकांसमोर प्रचंड गर्दी दिसल्याने जणू लॉकडाऊनचे लॉक तुटल्याचा भास होत होता.
शासनाने लॉकडाऊनच्या काळात अनेक योजनांमधून लाभाची घोषणा केली. लाभाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली का हे तपासण्यासाठी मंगळवारी बहुतांश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसमोर गर्दी पहायला मिळाली. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढण्यासाठी नागरिकांनी कडाक्याच्या उन्हात बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. नागरिकांची ही रांग अनेक बँकांच्या बाहेरपर्यंत गेली होती. काही ठिकाणी सावलीची व्यवस्था होती तर कुठे व्यवस्था असूनही त्याचा उपयोग होऊ शकला नाही. काही ठिकाणी सावली शोधण्याच्या नादात सोशल डिस्टन्सिंग झुगारण्यात आले. जनधन खात्यातील पैसे काढणाऱ्यांमध्ये बहुतांश वयोवृद्धांचा समावेश होता. याशिवाय प्रधानमंत्री गरीब कुुटुंब कल्याण योजनेचा दोन हजारांचा हप्ता बँकेत जमा झाला का हे तपासण्यासाठीही कित्येकांनी सकाळपासूनच बँकेसमोर रांगा लावल्या होत्या. काहींना केवळ बॅलन्स चेक करायचे होते, या गर्दीमध्ये निवृत्ती वेतनधारक, निराधारांचे मानधनधारक यांचाही समावेश होता.
स्टेट बँकेच्या धामणगाव रोड स्थित मुख्य शाखेत मोठी रांग पहायला मिळाली. याच बँकेच्या मार्इंदे चौक रोडवरील शाखेतही अशीच स्थिती होती. आझाद मैदानासमोरील महाराष्ट्र बँक तसेच युनियन बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व अन्य बँकांच्या शाखामध्ये खात्यातून पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सिव्हील लाईन येथील मिनी एटीएम शाखेत तर नागरिकांची गर्दी चक्क रस्त्यावर आली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने लांब रांग पहायला मिळाली. स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केली गेली होती. परंतु सोशल डिस्टन्सिंग व रांगेमुळे त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. त्यांना बाहेर थांबावे लागले. बँकेत आलेले ग्राहक अंतर पाळत नाहीत म्हणून त्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांना पाचारण केले गेले. पोलिसांनी त्यासाठी प्रयत्नही केले. मात्र नागरिकांचा नाईलाज होता. एवढ्या कडाक्याच्या उन्हात कुठे सोशल डिस्टन्सिंग पाळावे असा सवाल ते पोलिसांनाच विचारताना दिसले. या गर्दीत काहींनी मास्क लावला नसल्याचेही धोकादायक चित्र पहायला मिळाले. शहरात एका ठिकाणी भोजन वाटप सुरू होते. तेथेसुद्धा गरजूंनी प्रचंड गर्दी केली. परंतु सोशल डिस्टन्सिंग, मास्क व कोरोनापासून सावधगिरीच्या अन्य उपाययोजनांना तेथे फाटा दिला गेल्याचे चित्र होते. जनधनच्या ५०० रुपयांसाठी झालेली गर्दी पाहून गोरगरिबांच्या लॉकडाऊनमधील आर्थिक स्थितीचा अंदाज येतो.

रांगेतील नागरिकांंना पाणीही नाही
यवतमाळ शहरात सामाजिक कार्यकर्त्यांची बरीच गर्दी पहायला मिळते. बहुतांश प्रामाणिकच कार्य करीत असली तरी काही जण मात्र केवळ पोलीस पासवर संचारबंदीतही बिनधास्त फिरता येते म्हणून हंगामी सामाजिक कार्यकर्ते बनले आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष वर्तणुकीतून हीबाब अधोरेखीत होते. मंगळवारी अनेक बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात वयोवृद्धांची संख्या अधिक होती. तेथे तैनात असलेल्या पोलिसांना हे काही सामाजिक कार्यकर्ते आवर्जुन नाश्ता, जेवण, पाणी आणून देत होते. त्याच वेळी रांगेत उभ्या असलेल्या वयोवृद्धांनाही किमान पाणी देऊन त्यांची सेवा करण्याची माणुसकी कुणीही दाखविली नाही. हे नागरिक पाण्यासाठी कार्यकर्त्यांच्या तोंडाकडे पाहत होते. अशा संधीसाधू सामाजिक कार्यकर्त्यांच्या अशा वागण्याने मग केवळ सेवा हाच हेतू ठेऊन घराबाहेर पडलेल्यांकडेही साशंकतेने पाहण्याची समाजाला संधी मिळते.

यवतमाळच्या भाजी मंडईत सारेच बिनधास्त
संदीप टॉकीज परिसरातील विठ्ठलवाडी नजीकच्या कॉटन मार्केट भागात दररोज भाजी मंडई भरते. मंगळवारी सकाळी तेथे कोरोना असूनही खरेदीसाठी आलेले नागरिक बिनधास्त वागताना दिसले. तेथे ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्क होते. विशेष असे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना खरोखर होत आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी पालिका व पोलिसांवर आहे. या मंडईत नगरपरिषदेचे वाहन व कर्मचारी तैनात होते. परंतु त्यांचे या गंभीरबाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आले.

Web Title: Queue for money in front of banks even in the heat sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक