डीजेचा आवाज कमी करण्यावरून यवतमाळ जिल्ह्यात राडा; कार, घराची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 10:24 PM2021-11-15T22:24:18+5:302021-11-15T22:26:15+5:30
Yawatmal News वाढदिवसाच्या पार्टीत लावलेल्या डीजेचा आवाज कमी करा, असे सांगितल्याने झालेल्या भांडणात घराची व कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे घडली.
यवतमाळ : वाढदिवसाच्या पार्टीत लावण्यात आलेल्या डीजेचा आवाज त्रासदायक ठरत असल्याने आवाजाला विरोध करणाऱ्याच्या घरावर हल्ला करून घराची व अंगणातील कारची तोडफोड करण्यात आली. ही घटना रविवारी रात्री साधनकरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी वणी पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
साधनकरवाडी परिसरातील एका पानटपरीसमोर हा राडा झाला. त्याच परिसरातील देवानंद गेडाम यांच्या मालकीची ती पानटपरी आहे. रविवारी त्यांचा मुलगा सुभाष गेडाम याचा वाढदिवस होता. ताे साजरा करण्यासाठी सायंकाळी ७ वाजता पानटपरीसमोरच डीजे लावण्यात आला होता. या डीजेवरून मोठ्या आवाजात गाणी लावण्यात आली होती. त्या पानटपरीसमोरच सेवानिवृत्त औषध निर्माण अधिकारी मोरेश्वर अर्जुन देवतळे यांचे घर आहे. त्यांच्या वडिलांचे वय ८५ वर्षांचे असून त्यांना हृदयरोग व उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.
जोरजोराने डीजे वाजत असल्याने त्यांना त्रास होत होता. त्यामुळे मोरेश्वर देवतळे यांनी पानटपरीवर जाऊन डीजेचा आवाज कमी करण्याची सूचना केली. यासोबतच यासंदर्भात पोलिसांनादेखील सूचना दिली. माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पेट्रोलिंग करणारे वाहन या परिसरातून गेले. ही बाब खटकल्याने सुभाष देवानंद गेडाम, संतोष देवानंद गेडाम व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी देवतळे यांना तुम्ही पोलिसांना का सांगितले, असा जाब विचारून देवतळे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना शिवीगाळ केली.
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर देवतळे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या कारवर दगडफेक केली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. तसेच घरावरील काचेच्या टॉवरवरदेखील दगडफेक करण्यात आली. त्यामुळे काचा फुटल्या. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी देवानंद गेडाम, सुभाष गेडाम, संतोष गेडाम व नूतन गेडाम या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
: घरात येऊन दिल्या धमक्या
हा राडा सुरू असताना गेडाम कुटुंबीयातील महिलांनी घरात येऊन शिवीगाळ केल्याचा आरोप देवतळे यांनी तक्रारीतून केला आहे. गेडाम कुटुंबीय भांडखोर वृत्तीचे असून ते कधी काय करतील, याचा नेम नसल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी देवतळे यांनी केली आहे.