मुकींदपूरमध्ये कोंबडबाजारावर धाड; पोलिसांवर दगडफेक, दोन जण जखमी
By विलास गावंडे | Published: September 17, 2023 11:30 PM2023-09-17T23:30:32+5:302023-09-17T23:31:23+5:30
ही घटना रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास मुकींदपूर येथे घडली.
यवतमाळ : कोंबड बाजारावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर २० ते २५ जणांनी दगडफेक केली. या प्रकारात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास मुकींदपूर येथे घडली.
मुकींदपूर पारधी वसाहतीपासून दीड किलोमीटर अंतरावर कोंबडबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती नेर पोलिसांना मिळाली. या आधारे ठाणेदार बाळासाहेब नाईक ताफ्यासह मुकींदपूरमध्ये पोहोचले. पथक पोहोचताच कोंबड बाजार भरविणाऱ्यांनी या पथकावर दगडफेक केली. यात सतीश बहादुरे, कासम निमसुरवारे हे पोलिस कर्मचारी जखमी झाले.
दगडफेक करणारे संख्येने जास्त असल्याने पोलिसांचा प्रतिकार कमी पडला. या प्रकरणी दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेर तालुक्यातील मुकींदपूर व सिंदखेड परिसरात मोठ्या प्रमाणात कोंबडबाजार भरविला जातो. शिवाय दारू, गांजाची मोठ्या विक्री केली जाते. कोंबडबाजार भरविणाऱ्या काही लोकांनी पोलिस पथकावर दगडफेक केली. या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
आम्ही पथकासह मुकींदपूर शिवारात चालणाऱ्या कोंबडबाजारावर धाड टाकण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी २० ते २५ जणांच्या जमावाने दगडफेक केली. यात दोन पोलिस जखमी झाले. याबाबत २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
- बाळासाहेब नाईक, ठाणेदार, पोलिस स्टेशन, नेर