मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेल्वे भूसंपादन मोबदला वितरण
By admin | Published: May 7, 2017 12:57 AM2017-05-07T00:57:00+5:302017-05-07T00:57:00+5:30
वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम
धडक अभियान : शासन आपल्या दारी, २७ कोटी शेतकऱ्यांच्या हाती धनादेश
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्धा-यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात असून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवून थेट शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जावून मोबदला दिला जात आहे. याच उपक्रमांतर्गत शनिवारी बाभूळगाव पंचायत समितीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारी येथील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदल्याचे धनादेश देण्यात आले.
रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबवित ३ वर्षांतील प्रकरणांचा ११ महिन्यात निपटारा केला. यातून ३ कोटी रुपयांची बचत झाली. याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांची प्रशंसाही केली. यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांनी थेट गावात जाऊन लाभार्थ्यांना मोबदला देत असल्याचे सांगितले. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार अशोक उईके उपस्थित होते.
शुक्रवारी बोरजई येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते २६ कोटी ७४ लाखांचे वाटप करण्यात आले. यातून तब्बल ११८ हेक्टर ४८ आर. जमीन संपादित केली. यामुळे १८ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी जमीन उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांच्या पुढाकारात ही प्रक्रिया राबविली जात आहे. कळंब आणि यवतमाळ तालुक्यातील शेत जमीन संपादनाची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. एकूण ५८ किलोमीटरचा मार्ग येथून जाणार आहे. त्यापैकी २९ किलोमीटर रेल्वे मार्गासाठी जमिनीचे संपादन करून मोबदला वाटप झाले. आता उर्वरित आट प्रकरणांमध्ये १०० कोटींचा मोबदला वितरित केला जाणार आहे. हे उद्दिष्ट एक महिन्यात पूर्ण करण्याचा विडा भूसंपादन विभागाने उचलला आहे. एकरकमी मिळालेली रक्कम शेतकऱ्यांसाठी लाभाची ठरत आहे. त्यांना यातून इतरत्र मालमत्ता खरेदी करता येणार आहे. शिवाय चार पट मोबदला मिळत असल्याने न्यायालयीन प्रक्रियेवर होणाऱ्या खर्चातूनही त्यांची सुटका झाली.