रेल्वे प्रकल्पग्रस्तांना गावातच मोबदला
By admin | Published: April 22, 2017 01:46 AM2017-04-22T01:46:02+5:302017-04-22T01:46:02+5:30
वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया रेकॉर्डब्रेक पद्धतीने सुरू आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग : पालकमंत्री, खासदारांच्या उपस्थितीत पाच कोटींचे वितरण
यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्वाकांक्षी रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया रेकॉर्डब्रेक पद्धतीने सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांना थेट त्यांच्या गावात जाऊन मोबदला दिला जात आहे. कळंबनंतर यवतमाळ तालुक्यातील ३० शेतकऱ्यांना तळेगाव येथे चार कोटी ७० लाखांचे वाटप करण्यात आले. यामुळे तीन किलोमीटर रेल्वे रुळासाठी जमीन उपलब्ध झाली आहे.
पालकमंत्री मदन येरावार, खासदार भावना गवळी, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, रेल्वेचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा अवधी देण्यात आला. प्रत्यक्षात अकरा महिन्यातच अवॉर्ड घोषित करून खरीप हंगामापूर्वी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला दिला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांसोबतच शासनाचाही फायदा झाला आहे. दोन वर्षात व्याजापोटी ७३ लाख ६७ हजार अतिरिक्त द्यावे लागले असते.
शिवाय प्रकल्पग्रस्तांनाही ताटकळत रहावे लागले असते. ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे भू-संपादन अधिकारी विजय भाकरे यांनी शिघ्रसिद्ध गणकानुसार शेतीचा मोबदला निश्चित करून त्याचा लाभ दिला. याच पद्धतीने रेल्वे मार्गासाठी कळंब आणि आता यवतमाळ तालुक्यात जमीन संपादन झाली आहे. जूनअखेर इतर तालुक्यातीलही भू संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस रेल्वे भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांनी व्यक्त केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या दारी
भूसंपादन प्रक्रियेतील मोबदला मिळविण्यासाठी विविध दस्तऐवज लागतात. या कारणाने प्रकल्पग्रस्तांना जिल्हाधिकारी कार्यालयात येरझारा घालाव्या लागतात. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी थेट प्रशासनच प्रकल्पग्रस्तांच्या दारी पोहोचले. तिथेच कागदपत्रांची पूर्तता केली तसेच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जागेवर देण्यात आले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना खूष झाले.