पावसान ईचीन कहरच केला, बुढा वाहूनच गेला तरी टणटण राहिला..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 02:06 PM2020-07-13T14:06:21+5:302020-07-13T14:06:43+5:30
देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना यवतमाळ शहरातील पिंपळगाव परिसरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ७० वर्षांचा जख्ख म्हातारा दारू ढोसून टुन्न झाला... रात्री जोरदार पावसादरम्यान नालीत वाहून गेला. एका ठिकाणी जाऊन फसला. सकाळपर्यंत निपचित पडून राहिला. लोकांना वाटले बुढा मेला... पण लोक जवळ जाताच बुढा उठला अन् ताडकन् म्हणाला, कोई कुछ नही बोलेगा, सिर्फ मै बोलूंगा..!
देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणारी ही घटना यवतमाळ शहरातील पिंपळगाव परिसरात घडली. १२ ते १४ तास नाल्यात भर पावसात अडकून राहिलेला ७० वर्षीय म्हातारा वाचला. सहदेवराव नंदे असे या व्यक्तीचे नाव आहे.
पिंपळगाव परिसरातील कुंदन चौकात राहणारे सहदेवराव यांचा एकूणच किस्सा मजेदार आहे. दररोज दारू पिणे हा त्यांचा दिनक्रम आहे. दारू एकदा अंगात शिरली की सिनेमातील इन्स्पेक्टर, खलनायक, अभिनेता असे विविध नट त्यांच्या अंगात शिरतात आणि मग सुरू होतो पिक्चर. असाच दारू ढोसल्यानंतर रविवारी रात्रीही सहदेवरावांची डायलॉगबाजी सुरू होती. दारूच्या नशेत बडबडत घराकडे जाताना तोल जाऊन ते नालीत पडले. पावसामुळे तुडूंब भरलेल्या मोठ्या नालीत ते वाहात गेले. एका ठिकाणी रपट्याजवळ (छोटा पूल) अडकले. पाऊस सुरूच असल्यामुळे आणि रात्री सामसूम असल्यामुळे या घटनेची कुणालाही खबर नव्हती. दारूच्या नशेत टुन्न असलेले सहदेवराव रात्रभर थंडगार पाण्यात पडून राहिले.
सकाळी काही जणांच्या निदर्शनास हा प्रकार आला. हा ७० वर्षीय म्हातारा थंडगार पाण्याने मरण पावला असावा, असा सर्वांचा ग्रह झाला. कारण याच परिसरात अशाच पद्धतीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या झाली होती. पण अचानक नालीतून आवाज आला लक्ष्मी पांघरुण टाक, मले थंडी लागत हाय हे वाक्य ऐकून तर परिसरात आणखीच भीती निर्माण झाली. परंतु काही तरुणांनी हिमत करून मृतदेह बाहेर काढण्याचे ठरवले. पण अचानक सहदेवरावच्या अंगात पुन्हा सिनेमातील खलनायक शिरला आणि डायलॉग सुरू झाला कोई कुछ नही बोलेगा, सिर्फ मै बोलूंगा..!
रात्रभर थंडगार पाणी, त्यातही वय ७० वर्ष, नाल्याच्या पाण्यातील विंचू-सापांची भीती. असे असतानाही सहदेवराव वाचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यवतमाळचेच कवी शंकर बडे यांची पावसानं ईचीन कहरच केला लोकं म्हणे नागो बुढा वाहूनच गेला ही प्रसिद्ध कविता या घटनेमुळे पुन्हा ताजी झाली.
हा तर सीआयडी इन्स्पेक्टर !
या अजब व्यक्तिमत्त्वाचे खरे नाव सहदेवराव नंदे असले तरी त्यांच्या अजबगजब सवयींमुळे ते सीआयडी इन्स्पेक्टर म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. रविवारी रात्रभर पाण्यात अडकून सोमवारी सकाळी लोकांना जेव्हा हा म्हातारा गवसला, तेव्हा लोकांनाही आपला इन्स्पेक्टर असा कसा फसला याबाबत नवल वाटले. मात्र यवतमाळात लॉकडाऊन असतानाही या इसमाला दारू कुठून उपलब्ध झाली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.