यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; बळीराजाचा हुरूप वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 08:24 PM2022-07-04T20:24:57+5:302022-07-04T20:25:20+5:30
Yawatmal News रविवारसह सोमवारीही यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. व पेरण्यांना गती आली आहे.
यवतमाळ : मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. रविवारसह सोमवारीही जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना आता गती आली आहे. केळापूर तालुक्यासह झरीजामणी, मारेगाव, वणी आणि घाटंजी तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र, जून महिन्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली. अनेक तालुक्यात अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठ्या भागात पेरण्याही खोळंबल्या आहेत. जुलै महिना सुरू झाल्यानंतर मात्र पावसाळी वातावरण तयार झाले असून रविवारनंतर सोमवारीही यवतमाळसह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. केळापूर तालुक्यात सर्वाधिक सरासरी ५०.६ मिमी पाऊस झाला आहे तर झरी जामणी तालुक्यात ४०.२, मारेगाव ३४.८, वणी ३८.४, महागाव १६.५, उमरखेड १९.१, पुसद १०.८, नेर १८.९, आर्णी ११.४, दिग्रस १२.२, दारव्हा २२.६, कळंब २०.६, बाभूळगाव १४.१, घाटंजी ३१.३, राळेगाव ८.५ तर यवतमाळ तालुक्यात सरासरी २८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या खरबी (किनवट) पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुलावर खड्डे असल्याने वाहन चालकांना वाहन धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. याबरोबरच अनेक ठिकाणी रस्त्याकडेच्या नाल्या तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याचे तर काही ठिकाणी पाणी घरात शिरल्याचे वृत्त आहे.