यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले

By विशाल सोनटक्के | Published: July 1, 2024 12:52 PM2024-07-01T12:52:25+5:302024-07-01T12:52:58+5:30

२९ मंडळांमध्ये अतिवृष्टी : जिल्ह्यात सरासरी ३७ मिमी पाऊस

Rain lashed Yavatmal district | यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले

Rain lashed Yavatmal district

यवतमाळ : रविवारी रात्री यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस बरसला. दिग्रसमध्ये सर्वाधिक ७८.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर यवतमाळ तालुक्यातही सरासरी ७०.८ मिमी पाऊस कोसळला. जिल्ह्यातील २९ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस होता. 

रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी कोसळत होता. रात्री ७.३० नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू होता. जोरदार पावसामुळे जिल्ह्याच्या विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्वाधिक पावसाची नोंद दिग्रस तालुक्यात झाली असून येथे ७८.२ मिमी पाऊस झाला आहे. यवतमाळ तालुका ७०.८, बाभूळगाव ५१.२, कळंब ६३.४, दारव्हा ६९, आर्णी ६५.८, नेर ४२.६, पुसद ४९.८, उमरखेड ३०.१, महागाव ३०.९, वणी १.६, मारेगाव ०.७, झरी जामणी १.९, केळापूर २, घाटंजी १०.५ तर राळेगाव तालुक्यात २२.३ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. 

या मंडळामध्ये झाली अतिवृष्टी
जिल्ह्यातील ३६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये यवतमाळ तालुक्यातील यवतमाळ ७८.२५, हिवरी ८४, अर्जुना ८४, सावरगड ७८.२५, मोहा ८६.२५ आणि लोहारा मंडळात ८३.५० मिमी पाऊस झाला आहे. बाभूळगाव तालुक्यातील पहूर मंडळात ७१.५० मिमी पाऊस झाला. कळंब तालुक्यातील चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात कळंब मंडळ ६५, पिंपळगाव ९३.५०, सावरगाव ८७.७५, जोडमोहा ६९, दारव्हा तालुक्यातील दारव्हा मंडळात ६५, मांगकिन्ही ६६.५०, बोरी ८३, लाडखेड ९२.५० आणि महागाव मंडळात ९२.५० मिमी पाऊस झाला आहे. दिग्रस तालुक्यातील कलगाव मंडळात ११६.२५, तुपटाकळी ११६.२५ आणि सिंगद मंडळात ७२.७५, आर्णी तालुक्यातील आर्णी मंडळात ९८.२५, जवळा १२८.५०, बोरगाव ९८.२५, नेर तालुक्यातील मालखेड मंडळात १११.२५, पुसद तालुक्यातील  खंडाळा मंडळात ८५.५०, बेलोरा ७४, ब्राम्हणगाव ७८, जांबबाजार ७८, महागाव तालुक्यातील काळीदौलत मंडळात ६८.७५ तर राळेगाव तालुक्यातील राळेगाव मंडळात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Rain lashed Yavatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.