विदर्भाला तिसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:25 AM2018-02-14T11:25:26+5:302018-02-14T11:26:56+5:30
विदर्भातील काही जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भाचे नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरासह तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारीदा परिसरात मंगळवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/यवतमाळ/चंद्रपूर : विदर्भातील काही जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भाचे नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरासह तालुक्यातील सेमाडोह, घटांग, काटकुंभ, जारीदा परिसरात मंगळवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली. यामुळे आदिवासींच्या शेतातील गहू आणि हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सेमाडोह, अतिदुर्गम हतरू, खडीमल, दहेंद्री काटकुंभ, चुर्णी, माखला, घटांग या परिसरात मंगळवारी सकाळी ९ ते ११ असे तब्बल दोन तास पावसाने मुसळधार हजेरी लावली. यामुळे परतवाडा-खंडवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तालुक्यातील अनेक ठिकाणी लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याने घरावरील कवेलू फुटले.
यवतमाळ जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रत्यक्षात हे नुकसान यापेक्षाही मोठे असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. दरम्यान कृषी विभागाने सर्वेक्षण सुरू केले असून बुधवारी त्याचा अधिकृत अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतरच नुकसानीचा नेमका आकडा किती, हे स्पष्ट होणार आहे.
यवतमाळात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस कोसळला. दारव्हा तालुक्यात निंबाच्या आकारा एवढ्या गारा कोसळल्या. सतत तीन दिवसांपासून असमानी संकट जिल्ह्यावर घोंगावत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. कृषी विभाग केवळ ५० हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात एक लाख हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यावर गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यावर असलेली अवकाळी पावसाची गडद छाया सोमवारी खरी ठरली. सोमवारी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. त्यामुळे अनेकांच्या घरांची छप्परे उडाली तर राजुरा व वरोरा तालुक्यात गारपीट झाल्याने शेकडो हेक्टरवरील रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याने गारपीट व पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. सोमवारी हा अंदाज खरा ठरला. सुमारे दीड तास मध्यम व हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. शहरात अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक मुख्य मार्गावरील नाल्या बुजल्या. वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने अनेक गावांचा व शहरांचा वीज पुरवठा रात्रभर खंडीत होता. पावसामुळे शेकडो हेक्टरवरील हरभरा, ज्वारी, मुंग, लाखोरी, तूर, जवस, कापूस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची छप्परे उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आली असून नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याची मागणी आहे.