पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांची लावली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:45+5:302021-07-08T04:27:45+5:30
पुसद : तालुक्यात जवळपास १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. पावसाअभावी पिके कोमेजत ...
पुसद : तालुक्यात जवळपास १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे इवल्या पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. पावसाअभावी पिके कोमेजत आहेत. पाऊस रुसून बसल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.
तालुक्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे यावर्षी मृगाची पेरणी साधेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. प्रत्यक्षात मृग नक्षत्र मृगजळ ठरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा व्यक्त होत आहे. त्यानंतर पावसाचे कम बॅक झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या. त्यात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, उडीद, मूग, हळद आदी पिकांचा समावेश आहे.
खरीप पेरण्या झाल्यानंतर जवळपास १५ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट येऊ पाहत आहे. तालुक्यातील आडगाव, मारवाडी, रोहडा, बेलोरा, पांढुर्णा, हिवळणी, मांजरजवळा, हनवतखेडा, खंडाळा, जवळी, फेट्रा या भागामध्ये खरीप पेरण्यांना फटका बसला आहे. उधार, उसणवारी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. परंतु पावसाअभावी पेरण्या वाया जाणार असल्याने आता पुन्हा पेरण्या करण्यासाठी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणावेत, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.
दुबार पेरणीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना बियाणे व खते खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दररोज ढगाळ व पावसाळी वातावरण दिसून येते. आज पाऊस नक्की येणार असे वातावरण दिसत असताना रोज पाऊस हुलकावणी देतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.
बॉक्स
हंड्याने पाणी देऊन पीक जगविण्याची धडपड
पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. विहिरीला पाणी नाही. शेतातील भाजीपाला पिकांना जीवनदान देण्यासाठी हंड्याने पाणी आणून पिकांना जगवावे लागत आहे, असे रोहडा येथील शेतकरी राजू मारोती पोपळघट यांनी सांगितले.