पुसद उपविभागात पावसाने गाठली वार्षिक सरासरी
By admin | Published: August 3, 2016 01:33 AM2016-08-03T01:33:20+5:302016-08-03T01:33:20+5:30
पुसद उपविभागात यंदा पावसाने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे.
महागावात सर्वाधिक : पिके पिवळी पडण्याचा धोका
पुसद : पुसद उपविभागात यंदा पावसाने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. महागाव तालुक्यात तर वार्षिक सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला. अति पावसाने शेत तळे झाले असून पिके पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
पुसद उपविभागातील पुसद, उमरखेड, महागाव आणि दिग्रस तालुक्यात दररोज पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत असून बहुतांश प्रकल्प ओव्हर-फ्लो झाले आहे. महागाव तालुक्यात तर यंदा अतिवृष्टी झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ५५८.४० मिमी आहे. आतापर्यंत या तालुक्यात ९१४ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजे वार्षिक सरासरीच्या १०६.४८ टक्के पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत केवळ २७३ मिमी पावसाची नोंद झाली होती. या पावसामुळे तालुक्यात हाहाकार उडाला आहे. अनेक नदी-तीरावरील शेतात पाणी शिरले असून अनेकांची शेती खरडून गेली आहे. तर काही गावांमध्ये शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. पिके पिवळी पडत आहे.
पुसद तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ९१.४१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी ७९० मिमी आहे. आतापर्यंत तालुक्यात ७२३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३५३ मिमी पाऊस कोसळला होता. अशीच अवस्था उमरखेड तालुक्याचीही आहे. उमरखेडमध्ये वार्षिक सरासरीच्या ७५.३७ टक्के पाऊस कोसळला असून आतापर्यंत ६८३ मिमी पाऊस कोसळला आहे. दिग्रस तालुक्यात ८६.५२ टक्के पाऊस कोसळला असून या तालुक्याची वार्षिक सरासरी ८२१.८० मिमी आहे. आतापर्यंत तालुक्यात ७११ मिमी पाऊस कोसळला आहे. दिग्रस, पुसद, उमरखेड आणि महागाव या तालुक्यात दररोज पाऊस कोसळत आहे. यापावसामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. गत तीन वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ओल्या दुष्काळाचा सामना करण्याची वेळ आली आहे. आता पाऊस कधी थांबतो याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. (लोकमत चमू)
शेतांना आले तळ्याचे स्वरूप
अतिपावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहे. जमिनीतील पोषक मुलद्रव्य अतिपावसाने झाडांना मिळत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतात पाण्याचे तळे साचले असून विहिरीही ओव्हर फ्लो झाल्या आहे. शेतकरी आता पावसाला विश्रांती घे असे म्हणत आहे. मात्र दररोज ढगाळी वातावरण आणि पावसाची रिमझीम सुरू आहे. महागाव तालुक्यातील टेंभुरधरा येथील शेतात पाणी साचले असून पीक पूर्णत: खरडून गेले आहे. कृषी विभागाने या परिसराची पाहणीही केली आहे.