जोडमोहा परिसरातील पिकांना पावसाचा फटका
By admin | Published: August 13, 2016 01:33 AM2016-08-13T01:33:56+5:302016-08-13T01:33:56+5:30
सततच्या पावसामुळे जोडमोहा आणि मेटीखेडा महसूल मंडळात येत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
तण वाढले : फवारणीचाही परिणाम नाही
डोंगरखर्डा : सततच्या पावसामुळे जोडमोहा आणि मेटीखेडा महसूल मंडळात येत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जमिनी चिबडल्याने पीक उद्ध्वस्त होत आहे. शिवाय तण वाढल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. तणनाशकाची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
जोडमोहा व मेटीखेडा मंडळातील शेतकऱ्यांनी पऱ्हाटी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी प्रकारची पिके घेतली आहेत. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी केलेली पेरणी उलटली. दुबार पेरणी काही लोकांना करावी लागली. नंतर समाधानकारक पाऊस झाला. पिके जोमात असतानाच पावसाची संततधार सुरू झाली. थोडीही उसंत घेत नसल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. परिणामी कुठल्याही प्रकारची कामे शेतात झाली नाही. निंदन नसल्याने तण वाढले. तणनाशकाची फवारणी पाण्यामुळे निरूपयोगी ठरली. यात शेतकऱ्यांना भुर्दंड सहन करावा लागला.
जोडमोहा मंडळात पिडा, देवनाळा, तासलोट, शिवनी, नांझा, जोडमोहा, वाढोणा, पोटगव्हाण, तर मेटीखेडा मंडळातील डोंगरखर्डा, खोरद, रुढा, झाडकिन्ही, अंतरगाव, पालोती, मार्कंडा, किन्हाळा, पिंपळशेंडा, पहूर आदी गावे येतात. यासर्व गावांमधील बहुतांश शेतकऱ्यांची पिके प्रभावित झाली आहेत. कृषी विभागाने पीक परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत आहे. (वार्ताहर)