दारव्हा तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 09:57 PM2018-07-11T21:57:45+5:302018-07-11T21:58:25+5:30
जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
बुधवारपर्यंत एकूण ४६८.३७ मिमी पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणातील पावसामुळे तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला. त्याचबरोबर इतरही प्रकल्प व नदी, नाले, विहिरीमधील पाणीपातळी वाढली आहे. यावर्षी जून महिन्यात तालुक्यात पावसाचे आगमन झाले परंतु समाधानकारक बरसल्यानंतर मोठा खंड पडला. जुलै उजाडताच मात्र चांगला पाऊस पडला. ६ जुलैपासुन सारखा पाऊस सुरू आहे. ६ जुलैला २२ मिमी, ७ ला १० मिमी, १० ला ४४ मिमी तर ११ जुलैला ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढली आहे. मागील वर्षी या वेळेपर्यंत २४२ मिमी पाऊस पडला होता. या तुलनेत यावर्षी आतापर्यंत दुप्पट पाऊस झाला आहे. महत्वपूर्ण समजल्या जाणाºया म्हसणी येथील अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला आहे. यासोबतच गोखी, अंतरगाव, कुंभारकिन्ही प्रकल्पातही पातळी वाढली आहे. गेल्या डिसेंबरपासून कोरडी पडलेली अडाण नदीसह नाले वाहायला लागले. टंचाईग्रस्त गावांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात लागवडीखाली एकूण ६३ हजार हेक्टर क्षेत्र असून यावर्षी सोयाबीन व कापूस या पारंपरिक पिकाखाली मोठ क्षेत्र आहे. समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती चांगली आहे मात्र सततच्या चिरी-चीरी पावसामुळे मात्र शेतीच्या कामात संथ गती अली आहे.