पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 05:00 AM2021-09-05T05:00:00+5:302021-09-05T05:00:12+5:30
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात साधारणपणे ६७४ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात या तीन महिन्यात ७७९ मिमी सरासरी पाऊस कोसळला. हा पाऊस या तीन महिन्यांच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ११५.५ टक्के इतका होता. ऑगस्टच्या मध्यंतरानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वरुणराजाने यंदाही बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे. सप्टेंबरमध्येच जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या १०१.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये नऊ तालुक्यात १०० टक्क्यांहून अधिक पाऊस कोसळला आहे, तर सात तालुक्यांना अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. सर्वात कमी पाऊस राळेगाव आणि पुसद तालुक्यात झाला आहे. राळेगाव येथे ८०.७, तर पुसद येथे ८५.४ पाऊस शुक्रवारपर्यंत झाला आहे.
यंदा जून महिन्यातच पावसाने दमदार हजेरी लावली. या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पेरणीला लागला. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात साधारणपणे ६७४ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात या तीन महिन्यात ७७९ मिमी सरासरी पाऊस कोसळला. हा पाऊस या तीन महिन्यांच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ११५.५ टक्के इतका होता. ऑगस्टच्या मध्यंतरानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये पावसाचे पुन्हा जोरदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गुरुवारनंतर शुक्रवारीही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यवतमाळ शहरात तासाभरात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत यवतमाळ तालुक्यात सरासरी २१.१ मिमी पाऊस झाला आहे, तर वणी, मारेगाव, झरीजामणी तालुक्यालाही पावसाने चांगलेच झोडपले आहे. वणी तालुक्यात २२.३, मारेगाव २६.४, झरीजामणी ३९.६, केळापूर २२.५, तर घाटंजी तालुक्यात १३.२ मिमी पाऊस झाला आहे. दिग्रस, बाभूळगावसह आर्णी, राळेगावमध्येही पावसाचा जोर कायम होता.
सर्वच तालुके पावसाळा संपण्यापूर्वी सरासरी ओलांडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात शेती सिंचनासाठी पाणी मिळण्याची अपेक्षा बळावली आहे.
मंदिराच्या कळसावर कोसळली वीज
महागाव : तालुक्यातील काळी दाै. येथे शेतात व मंदिरावर वीज कोसळली. यात एक बैल ठार झाला, तर मंदिराच्या कळसाचे किरकोळ नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यात शनिवारी दुपारी अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. काही वेळातच जोरदार पावसाने हजेरी लावली. काळी दाै. येथे पावसामुळे ढगफुटीसारखी स्थिती निर्माण झाली होती. यावेळी शेतात वीज कोसळल्याने गोपाल चंदूसिंग राठोड यांचा एक बैल जागीच ठार झाला. गोपाल आणि दुसरा बैल थोडक्यात बचावले. मात्र हंगामात बैल ठार झाल्याने गोपाल राठोड यांचे ५० हजाराचे नुकसान झाले. दुसऱ्या घटनेत काळी दौ. येथील सामकी माता मंदिराच्या घुमटावर वीज कोसळली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र मंदिराच्या कळसाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
शेती नुकसानीचे संकेत
सततच्या ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे व पांढरी माशी या किडींनी हल्ला केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संकेत पातळी गाठताच पिकावर इमिडायक्लोपिड १७.८ टक्के आणि एसअल २.५ मिली किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के म्हणजे २० मिली प्रति दहा लिटर पाण्यात टाकून फवारावे.
निळोणा, चापडोह भरले
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा व चापडोह प्रकल्प १०० टक्के भरले आहे. दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, बेंबळा प्रकल्पात शनिवारी ८६.७६ टक्के, इसापूर प्रकल्पात ८३.२६ टक्के, अरुणावतीमध्ये ८९.४५ तर पूस प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा होता.