कपाशी पिकांना पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:48 AM2021-09-15T04:48:26+5:302021-09-15T04:48:26+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा अस्मानी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सध्या तालुक्यातील पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसत ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षीही पुन्हा अस्मानी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सध्या तालुक्यातील पिकांची परिस्थिती समाधानकारक दिसत असली तरी पुढील काही दिवस अशाच पद्धतीने पाऊस पडत राहिल्यास पिके धोक्यात येण्याची भीतीसुद्धा वर्तविण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील काही भागांतील शेतातील कपाशीची बोंडे सडू लागल्याचेही दिसून येत आहे, तर वातावरणातील आर्द्रतेमुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर वाढला असल्याचेही दिसून येत आहे. चालबर्डी रोडवरील प्रा. अजय सोळंके यांच्या शेतात कपाशीची बोंडे सडल्याचे दिसून येत आहे. पुढील काळात जर पाऊस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पावसामुळे गवतसुद्धा शेतामध्ये वाढीस लागले असून त्याच्या काढणीचाही खर्च आता वाढत चालल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच मर रोगासह विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना कपाशी पिकासह सोयाबीन पिकाबद्दल मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.