पावसामुळे पणन महासंघाला अडीचशे कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:37 PM2020-06-09T12:37:30+5:302020-06-09T12:41:27+5:30
राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने पणन महासंघाचा अडीचशे कोटी रुपयांचा कापूस ओला झाला. यामध्ये रुईगाठी आणि सरकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या स्थितीत ३० जूनपर्यंत आणखी १५ लाख क्विंटल कापूस खरेदी करण्याचे आव्हान उभे आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली.
ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीसाठी आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. अध्यक्ष देशमुख म्हणाले, पणन महासंघाने आतापर्यंत राज्यभरात ७४ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून १५ लाख गाठी तयार केल्या आहेत. राज्यभरातील ८५ केंद्र आणि १७० जिनिंग फॅक्टरीमध्ये या कापसाची खरेदी करण्यात आली. राज्यात अनेक केंद्रांवर कापूस खरेदीसाठी ताण वाढला. काही ठिकाणी दबावही आला. अशात उघड्यावर पडलेला कापूस, रूईगाठी आणि सरकीचे अडीचशे कोटींचे नुकसान झाले.
४० लाख क्विंटल कापूस विक्रीसाठी पडून
संपूर्ण राज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी पणन महासंघाकडे नोंद केली आहे. या शेतकऱ्यांकडे ४० लाख क्विंटल कापूस आजच्या घडीला विक्रीसाठी पडून आहे. यातील किमान १५ लाख क्विंटल कापूस एफएक्यू दर्जाचा असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हा कापूस खरेदी करण्यासाठी ३० जूनपर्यंतचे नियोजन आहे.
पणनला तारीख वाढवावी लागणार
निर्धारित कालावधीमध्ये हा कापूस खरेदी होणे अशक्य आहे. यामुळे पणनला आणखी तारीख वाढवावी लागणार आहे. राज्यभरात आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचा कापूस खरेदी झाला. तर साडेतीन हजार कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.अद्याप ५०० कोटी रुपयांचे चुकारे बाकी आहे. याकरिता ८० कोटी रुपयांची तरतूद पणन महासंघाने केली. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वळते होतील, असेही राजाभाऊ देशमुख यांनी स्पष्ट केले.
पणनची पाचशे रूपये दरवाढीची मागणी
केंद्र शासनाने कापसाचे हमी दर नुकतेच जाहीर केले आहे. गतवर्षीच्या दरापेक्षा त्यामध्ये २६० रुपयांची वाढ केली आहे. लांब धाग्याच्या कापसाला यामुळे ५८१० रुपये क्विंटलचा दर मिळणार आहे. तर आखुड धाग्याच्या कापसाला ५६०० रुपयांचा दर राहणार आहे. हे दर शेतकऱ्यांना परवडणारे नाही. यामुळे पणन महासंघाने ५०० रुपये क्ंिवटल दरवाढ करण्याची शिफारस करणार आहे.
दहा टक्के नोंदणी संशयास्पद
राज्यभरात एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांकडे कापूस पडून असल्याचे सांगितले जाते. त्याचे वास्तव जाणून घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण पार पडले. यावेळी नोंदणी झालेल्या कापसापैकी १० टक्के नोंदणी संशयास्पद आढळल्या असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.