महागाव तालुक्यात पावसाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:48 AM2021-08-20T04:48:49+5:302021-08-20T04:48:49+5:30
फोटो महागाव : मुसळधार पावसाने तालुक्यात कहर केला आहे. पुरात वाहून गेल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. शेकडो हेक्टर जमीन ...
फोटो
महागाव : मुसळधार पावसाने तालुक्यात कहर केला आहे. पुरात वाहून गेल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. शेकडो हेक्टर जमीन आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भांब येथील सिमेंट बंधाऱ्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रोहन भालेराव (वय १९) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विदर्भ-मराठवाडा सीमेवरील धनोडा येथे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे दोन्ही बाजूंनी पिकांचे नुकसान झाले. हिवरा, धनोडा, सेवानगर, कासारबेहळ, राहूर, आदी ठिकाणी शेतात पाणी घुसल्याने पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागातील नाल्यांना आलेल्या पुरामुळे माळवागद, दहिवड, मोहदी, आदी ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. काळी दौ. सर्कलमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने बुधवारी (दि. १८) करण्यात आले.
गुरुवारी सकाळी पावसाचा जोर कायम असताना भांब येथील रोहन भालेराव हा मित्रांसमवेत शेळ्यांचा चारा आणण्याकरिता गेला होता. गावालगतच्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये तो पाय घसरून पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पैनगंगेला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा त्वरित पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी गावस्तरावरून होत आहे.