टंचाईत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:33 PM2018-05-04T22:33:33+5:302018-05-04T22:33:33+5:30

घरबांधणीची परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेला आता कडव्या टंचाईने ठिकाणावर आणले आहे. प्यायला पाणी पुरविणे अशक्यप्राय झालेले असताना प्रशासनाने घरोघरच्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची शनिवारपासून झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Rainwater Harvesting Survey | टंचाईत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे सर्वेक्षण

टंचाईत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे सर्वेक्षण

Next
ठळक मुद्देघरोघरी वृक्ष गणना : भीषण पाणीटंचाईने नगर परिषदेला आणले ताळ्यावर

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घरबांधणीची परवानगी देताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेला आता कडव्या टंचाईने ठिकाणावर आणले आहे. प्यायला पाणी पुरविणे अशक्यप्राय झालेले असताना प्रशासनाने घरोघरच्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची शनिवारपासून झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा हा प्रकार आताच नेमका कशासाठी, असा प्रश्न पडला आहे.
विशेष म्हणजे, तापमान ४४ अंशांच्या पलिकडे गेल्यावर नगरपालिकेला यवतमाळातील झाडांची संख्या मोजण्याचेही शहाणपण सुचले आहे. पाणीटंचाई जीवघेणी बनल्यावर आणि मे महिना तापल्यावर शुक्रवारी नगरपालिकेत यासंदर्भात बैठक घेण्यात आली. शहरात पावसाचे पाणी थांबवायचे असेल तर, झाडांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. अडीच लाख लोकसंख्या असताना किमान अडीच तीन लाख मोठी झाडे असणे गरजेचे आहे. पण त्यादृष्टीने कधीच प्रयत्न होत नाही. वास्तविक, शहरातील झाडांबाबत १९७५ सालच्या महाराष्ट्र वृक्षजतन कायद्याचे काटेकोर पालन केल्यास दर पाच वर्षांनी वृक्षगणना करणे बंधनकारक आहे. पण नागरिक आणि प्रशासन त्याकडे आजवर दुर्लक्ष करीत आलेले आहे. आता पाण्याविना प्राण कंठाशी आल्यावर प्रशासनाला या कायद्याची अचानक आठवण झालेली आहे. शनिवारपासून भर उन्हात फिरून पालिकेचे कर्मचारी दरडोई किती झाडे आहेत, याचा सर्वे करणार आहेत. यात १५ फुटावरील आणि खालील झाडे किती, झाडांची गोलाई किती, त्रिज्या किती अशी माहिती गोळा केली जाणार आहे.
त्याचवेळी किती घरांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करून पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जाते, याचीही झाडाझडती घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात घर बांधकामाची परवानगी देतानाच नगरपालिकेकडून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची अट घातली जाते. पण क्षुल्लक पैसे वाचविण्यासाठी नागरिक ही अट टाळतात आणि नगरपालिकेचे प्रशासनही त्याकडे कानाडोळा करत आलेले आहे. यवतमाळातील प्रत्येक घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग झालेली असती, तर आज टंचाईची तीव्रता बºयाच प्रमाणात कमी असती, असा साक्षात्कार आता प्रशासनाला झालेला आहे. अर्ध्याअधिक घरांमध्ये असे हार्वेस्टिंग न आढळण्याचीच शक्यता अधिक आहे.
तीन दिवसात उरकणार का सर्वे?
विशेष म्हणजे, अडीच लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात केवळ तीन दिवसात हे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी नगरपालिकेच्या कर्मचाºयांवर सोपविण्यात आली आहे. आरोग्य विभाग, कर विभाग आणि शिक्षकांची शुक्रवारी बैठक घेऊन त्यांना सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले. यात सफाई कर्मचारी आणि प्रामुख्याने शिक्षकांना जुंपण्यात येणार आहे. शहरात इमारती किती, त्यात कम्पाउंड किती, त्यात झाडे किती, विहिरी किती, विंधन विहिरी किती अशी माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही माहिती केवळ तीन दिवसात कशी गोळा होणार, असा प्रश्न कर्मचाºयांनी बैठकीत उपस्थित केला.

Web Title: Rainwater Harvesting Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.