पावसाची दडी, शेतकरी चिंतेत
By admin | Published: August 24, 2016 01:09 AM2016-08-24T01:09:59+5:302016-08-24T01:09:59+5:30
सोयाबीन ऐन फुलोऱ्याच्या स्थिती असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
डोळे आकाशाकडे : सोयाबीन, कापूस करपू लागले, सिंचनासाठी धडपड
पुसद : सोयाबीन ऐन फुलोऱ्याच्या स्थिती असताना पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. गत २४ दिवसांपासून पाऊ नसल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, तूर पिकाने माना टाकल्या आहेत. एक-दोन दिवसात पाऊस आला नाही तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.
पुसद उपविभागात यंदा सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकऱ्यांनी पेरणी केली. पीक जोमात वाढू लागले. परंतु आता २४ दिवसांपासून उपविभागात पावसाने दडी मारली आहे. बहरलेला खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुटली असून, पिके माना टाकत आहे. खडकाळ जमिनीतील पिके वाळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पूर्वी कपाशीतून उत्पन्न मिळविणारा तालुक्यातील शेतकरी नगदी पीक असलेल्या सोयाबीनकडे वळला आहे. कपाशीचा लागवड खर्च वाढला आहे. कीड नियंत्रणासाठी मोठी दमछाक होते. त्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळले आहे.
तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे क्षेत्र दिसत आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने पीक माना टाकत आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी ओलित करीत आहे. परंतु ८० टक्के शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या तीन-चार दिवसात पाऊस न झाल्यास खरिपाची पिके हातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गत वर्षी खरिप हंगामाने शेतकऱ्यांना दगा दिला. यावर्षी पिकांची स्थिती चांगली आहे. परंतु आता पावसाची आवश्यकता असताना पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतीची कामे आटोपली असून, आता पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नारायण पुलाते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)