बहुरूपी समाजातील जयावर कौतुकाचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:10 AM2018-06-20T00:10:03+5:302018-06-20T00:10:03+5:30
बाल विवाहाच्या प्रथेमुळे जेथे एकही मुलगी आठवी पलीकडे शिक्षण घेऊ शकली नाही, अशा वस्तीत राहणारी जया सुनील शिंदे ही मुलगी दहावीपर्यंत पोहोचून प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बाल विवाहाच्या प्रथेमुळे जेथे एकही मुलगी आठवी पलीकडे शिक्षण घेऊ शकली नाही, अशा वस्तीत राहणारी जया सुनील शिंदे ही मुलगी दहावीपर्यंत पोहोचून प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाली. तिच्या संघर्षमय यशाची कहाणी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच विविध राजकीय पक्षांनी जयाच्या सत्कारासाठी धाव घेतली. सध्या जया आणि तिच्या शिक्षिकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी आपल्या कार्यालयात शिवसेना महिला आघाडीतर्फे जया शिंदे हिच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला. यावेळी ज्योती चिखलकर, चिंटू बांगर आदी उपस्थित होते. तर शहर काँग्रेस कमिटी तसेच शहर महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा झाला. यावेळी जया शिंदे आणि तिची शिक्षिका शुभांगी आवारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, मनिष पाटील, बाबासाहेब गाडे पाटील, राहुल ठाकरे, उषाताई दिवटे, चंद्रशेखर चौधरी आदी उपस्थित होते.
प्रहार विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी थेट बहुरूपी समाजाच्या वस्तीत पोहोचले. जयाच्या घरी जाऊन तिच्या यशाला सलाम करत सत्कार करण्यात आला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे, प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी राऊत, कुलसंगे, परेश बुटे, अंकुश कुलरकर, राजू पठाडे आदी उपस्थित होते. जयाच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.