राजस्थानी सावकारांचा पुन्हा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 09:55 PM2018-08-27T21:55:05+5:302018-08-27T21:55:18+5:30
गरजू कष्टकऱ्यांना कर्ज देऊन अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्या लुटारू राजस्थानी सावकारांची टोळी पुन्हा एकदा वणी तालुक्यात दाखल झाली आहे. मध्यंतरी तालुक्यातील घोन्सा येथील काही नागरिकांनी मुकूटबन पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईच्या भीतीने ही टोळी भूमिगत झाली होती. मात्र ही टोळी वणी तालुक्यात पुन्हा दाखल झाली असून घोन्सा येथून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार सुरू असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गरजू कष्टकऱ्यांना कर्ज देऊन अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्या लुटारू राजस्थानी सावकारांची टोळी पुन्हा एकदा वणी तालुक्यात दाखल झाली आहे. मध्यंतरी तालुक्यातील घोन्सा येथील काही नागरिकांनी मुकूटबन पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईच्या भीतीने ही टोळी भूमिगत झाली होती. मात्र ही टोळी वणी तालुक्यात पुन्हा दाखल झाली असून घोन्सा येथून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार सुरू असल्याची माहिती आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांपेक्षाही अतिशय घातक असलेल्या या टोळीविरुद्ध घोन्सा येथील काही जागृक नागरिकांनी मुकुटबन पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावेळी मुकुटबन येथील ठाणेदारांनी घोन्सा येथे येऊन तक्रारकर्ते व गावकºयांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र तक्रार केल्याची भनक लागताच, राजस्थानी सावकरांची ही टोळी पसार झाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून या टोळीतील काही सदस्य घोन्सा येथे एका किरायाच्या खोलीत वास्तव्याला आहेत. एका गाव पुढाºयाच्या आश्रयाने या सावकारांचा गोरखधंदा सुरू असल्याची गावात चर्चा आहे.
गरजू कष्टकºयांना हेरायचे. त्यांना पाच हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज द्यायचे. एखाद्या दहा हजार रुपये कर्ज द्यायचे असेल तर त्याच्या हाती केवळ सात हजार रुपये दिले जातात. उर्वरित तीन हजार रुपयांत एक निकृष्ट दर्जाची ताडपत्री घेण्यास बाध्य केले जाते. ती आवश्यक नसली तरी कर्जदाराला ती पैशाच्या गरजेपोटी घ्यावी लागते. ताडपत्री न घेणाºयास कर्ज दिले जात नाही.
मुळात सदर ताडपत्रीची किंमत बाजारात केवळ पाचशे रुपये आहे. मात्र तीच ताडपत्री कर्जदाराला तीन हजार रुपयांत दिली जाते. कर्ज दिल्यानंतर कर्जदाराच्या हाती शेतातील पिक येताच, कर्जदाराकडून दहा हजारांवरील व्याजासह १५ हजार रुपये उकळले जात आहेत. पोलीस यंत्रणा मात्र या विषयात मूग गिळून गप्प बसली आहे. परिणामी वणीसह झरी तालुक्यातील गरजूंची या सावकारांकडून अक्षरश: लूट केली जात आहे. या सावकारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी केली जात आहे.
देखाव्यासाठी सावकार बनले शेतकरी
राजस्थानी सावकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल होताच, या सावकारांनी या भागात थांबण्यासाठी एक नवा फंडा अंगिकारला आहे. देखावा करण्यासाठी यांनी घोन्सा परिसरात तब्बल ४० एकर शेती भाडेतत्वावर केली आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी घोन्सा येथील ‘अनिल’ नामक बेरोजगार युवकाची नेमणूक केली असून हा ‘अनिल’ सावकारांनी भाडेतत्वावर केलेल्या शेतीचे व्यवहार सांभाळत असून सोबतच कर्जदार ग्राहक पाहून देण्याचेही काम पाहत असल्याचे सांगण्यात येते.