राजूरचे पाणी निर्गुडा नदीत सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 10:29 PM2018-02-02T22:29:31+5:302018-02-02T22:30:16+5:30
हो.. नाही म्हणत अखेर राजूर खाणीतील पाणी वणीच्या निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : हो.. नाही म्हणत अखेर राजूर खाणीतील पाणी वणीच्या निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला.
गेल्या १५ दिवसांपासून वणी शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा ठप्प आहे. नवरगाव धरणातही पाण्याचा अल्पसाठा असल्याने तेथूनही आवश्यक पाणी सोडले जात नसल्याने वणीतील पाण्याची स्थिती भयावय आहे. नागरिकांचे पाण्यासाठी अक्षरश: हाल सुरू आहेत. ही बाब लक्षात घेऊन काही नगरसेवकांनी राजूर खाणीतील पाणी निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे केली होती. वर्धा नदीवरून पाणी पुरवठा योजना सुरू होईस्तोवर राजूर खाणीतील पाण्याचा वणीकरांना मोठा आधार होईल, असे या नगरसेवकांचे म्हणणे होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या निवेदनाची तातडीने दखल घेत बुधवारी चिखलगाव परिसरात साठलेल्या राजूर खाणीतील पाण्याची पाहणी करून हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची चाचपणी करण्याच्या सूचना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना केल्या. मात्र या पाण्यात क्षार व आर्यन मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता लक्षात घेऊन नगराध्यक्ष बोर्डे यांनी हे पाणी नदीत सोडण्यास सुरूवातीला नकार दिला होता. मात्र तपासणीअंती गुरुवारी रात्री या पाण्याचा अहवाल प्राप्त झाला. सदर पाणी केवळ वापरण्यायोग्य नाही तर पिण्यायोग्यदेखील असल्याचा अहवाल वणी पंचायत समितीच्या पाणी परीक्षण प्रयोगशाळेने दिल्यानंतर सदर पाणी निर्गुडा नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
लिकेज बंद केल्यास तीन दिवसांत पाणी पोहचणार
सन २००४ मध्ये वणी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी वणी नगरपालिकेच्या तत्कालिन सत्ताधाºयांनी राजूर खाणीतील पाणी पाईपलाईन टाकून वणीतून वाहणाऱ्या निर्गुडा नदीत सोडले होते. मात्र एक महिन्यानंतर पाणी टंचाई संपली. त्यामुळे ही पाईपलाईन निकामी पडून होती. परिणामी या पाईपलाईनला अनेक ठिकाणी लिकेजस आहे. हे लिकेजसची दुरूस्ती तातडीने झाल्यास तीन दिवसांत खाणीचे पाणी नदीत पोहचणार आहे.