बांधावर जाऊन बांधली शेतकरी बांधवाला राखी
By admin | Published: August 20, 2016 12:23 AM2016-08-20T00:23:45+5:302016-08-20T00:23:45+5:30
देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना दरवर्षी देशभरातील बहिणी राख्या पाठवित असतात.
महिलांचा पुढाकार : जय जवान जय किसानचा नारा
पुसद : देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना दरवर्षी देशभरातील बहिणी राख्या पाठवित असतात. परंतु शेताच्या बांधावर राबणारा शेतकरी मात्र उपेक्षितच राहतो. जय जवान जय किसान असा नारा आपल्या देशात दिला जात असताना किसान मात्र उपेक्षितच राहतो. हीच बाब हेरुन पुसद येथील महिलांनी रक्षाबंधनाच्या दिवशी शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी बांधवांना राखी बांधली.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु अलिकडे विविध कारणांमुळे त्याचे मनोधैर्य खचत आहे. निसर्गाची अवकृपा आणि कर्जाचा डोंगर यामुळे तो मेटाकुटीस आलेला आहे. अशा या शेतकरी बांधवाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पंचायत समितीच्या सदस्या आशा संजय चव्हाण यांनी आगळावेगळा रक्षाबंधनाचा उपक्रम हाती घेतला. रक्षाबंधन आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून त्यांनी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला. मोहा सर्कलमधील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेतले. तसेच ज्योतीनगर येथील महिला घेऊन वाजत गाजत शेताच्या बांधावर पोहोचल्या.या ठिकाणी वसंतराव नाईकांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व महिलांनी डफडीच्या तालावर फेर धरला. यावेळी शेतांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना राखी बांधली. विशेष म्हणजे या राख्या घाटोळी तांडा शाळेतील विद्यार्थिनींनी तयार केल्या होत्या.
या उपक्रमात पंचायत समिती सदस्य आशा चव्हाण यांच्यासह धुंदीच्या सरपंच अश्विनी धरमसिंग राठोड, सदस्य शारदा गौतम, घाटोळीच्या सरपंच अनिता चव्हाण, मोहाचे सरपंच लीला राठोड, उषा राठोड, ज्योतीनगरच्या सरपंच मिनाक्षी राठोड, उपसरपंच सविता राठोड, सदस्य पंचीबाई जाधव, सुमित्रा दुमारे, सुरेखा राठोड, काशीबाई राठोड, मीराबाई राठोड, संगीता राठोड, शिला राठोड, गंगा जाधव,पारीबाई चव्हाण, शेरीबाई राठोड, बेबीताई चव्हाण, शांताबाई चव्हाण, कमलाबाई इसळकर, शकुंतला पाचंगे, शिक्षिका सरला भागानगरे, ग्रामसेविका एस.एल. बाळगुळे, प्रा. संजय चव्हाण, शिक्षक सुरेश मांडवगडे, राम राठोड, राहुल पवार, अॅड. संजय राठोड, अशोक वडते, डी.के. राठोड, बाबूलाल राठोड, मांगीलाल राठोड, समाधान राठोड, विजय राठोड, नागोराव जाधव, नामदेव शेळके, अर्जुन जाधव, पंडित चव्हाण, धर्मा पवार, जानूसिंग जाधव, यादव खोकले, ज्ञानेश्वर चव्हाण, राघो गायकवाड, बाबूसिंग पवार, राजू राठोड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)