आदिवासी भगिनींच्या राख्या पोहोचल्या सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 11:20 AM2021-08-09T11:20:41+5:302021-08-09T11:22:02+5:30
Yawatmal News आदिवासी भगिनींनी बांबूपासून राखी बनविण्याचे काम सुरू केले आहे. या राख्या राज्यातील विविध जिल्ह्यासह ४० देशात पोहोचल्या आहेत.
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज विविध कलेच्या बाबतीत समृध्द आहे. आदिवासी आणि बांबूकला हा अविभाज्य अंग राहिला आहे. आदिवासींची ही कला जिवंत ठेवण्यासाठी लवादा (ता.धारणी, जि.अमरावती) येथे केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी आज जवळपास ४०० कारागीर बांबूच्या विविध वस्तू बनवित आहे. विशेष म्हणजे, आदिवासी भगिनींनी बांबूपासून राखी बनविण्याचे काम सुरू केले आहे. या राख्या राज्यातील विविध जिल्ह्यासह ४० देशात पोहोचल्या आहेत.
पर्यावरण समृध्दीसाठी जगभरात काम हाेत आहे. याचाच एक भाग म्हणून आदिवासी समाजबांधव पुढे सरसावले आहे. पांढरकवडा आणि मेळघाट हा आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. यापासून विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार केल्या जातात. फ्लाॅवर पाॅट, पेपरवेट, घर, घड्याळ आणि इतर शोभेच्या वस्तू बनविण्यात आदिवसी बांधव तरबेज आहे. याच कलेला राखीची जोड देत बांबूपासून राखी बनविण्याचे मोठे काम महिलांनी हाती घेतले आहे.
गतवर्षी अशा ४० हजार राख्या बनविण्यात आल्या होत्या. या देशभरात विक्री करण्यात आल्या. आता ५० हजार राखीचे नियोजन त्यांनी केले आहे. बारीक कमच्यापासून बनविलेल्या या राख्या आदिवासी कारागिरांच्या उपजीविकेचे साधन झाले आहे. या राख्यांना आज राज्यासह विविध देशातून मागणी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल घेेतली. लवादच्या केंद्राची धुरा सुनील देशपांडे (दिवंगत) यांनी सांभाळली होती. आता त्यांच्या पत्नी निरुपमा देशपांडे या ही कला विकसित करण्यासाठी आणि आदिवासी समाजाला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी काम करीत आहे.
बालकांना आकर्षित करणारी कला
लवादा केंद्रातील महिलांनी विविध कलाकुसरीच्या राख्या तयार केल्या आहेत. बालकांना आकर्षित करेल, अशाही राख्या त्यांनी बनविल्या. याशिवाय मोर, स्वस्तिक, डोळे यासह काही शुभसंकेताचे चिन्ह प्रतिबिंबित करणाऱ्या राख्या घडविल्या आहेत.
आदिवासी महिलांनी तयार केलेली एक राखी विकली गेली तर एका वेळच्या भोजनाची चिंता मिटते. दुर्गम भागातील महिलांना रोजगार मिळावा म्हणून हे केंद्र काम करीत आहे. त्यातूनच बांबूपासून राख्यांची निर्मिती झाली आहे.
निरुपमा देशपांडे, अध्यक्ष, संपूर्ण बांबू केंद्र, लवादा