राळेगावचे सभापती, उपसभापती ईश्वरचिठ्ठीवर!

By admin | Published: February 25, 2017 01:01 AM2017-02-25T01:01:12+5:302017-02-25T01:01:12+5:30

पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागी भाजप, तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निर्वाचित झाले.

Ralegaon chairperson, Upasabhapati Ishwar Chitthite! | राळेगावचे सभापती, उपसभापती ईश्वरचिठ्ठीवर!

राळेगावचे सभापती, उपसभापती ईश्वरचिठ्ठीवर!

Next

पंचायत समिती : भाजप-काँग्रेसकडे तीन-तीन दावेदार, एकत्र बसून तोडगा शोधण्याची शक्यता कमी
के.एस. वर्मा   राळेगाव
पंचायत समितीच्या सहा पैकी तीन जागी भाजप, तर तीन जागी काँग्रेसचे उमेदवार निर्वाचित झाले. आता सभापती व उपसभापतीपदी कोणत्या पक्षाचे उमेदवार येतील, हा निर्णय ‘टाय’ झाला आहे. सभापतीपद खुले आहे. सहा पैकी कुणाचेही वर्णी लागू शकते. निवडीच्या दिवशी दोनही पक्षांचे नेते एकत्र येवून तोडगा काढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीनेच ही दोनही पदे ठरविली जातील, असे चित्र दिसत आहे.
झाडगाव सामान्य व वाढोणाबाजार या इतर मागास प्रवर्गात भाजप, सेना, काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली. प्रशांत तायडे यांनी ३६०५ मते घेतली, तर सेनेचे तालुका प्रमुख विनोद काकडे यांनी २२३७ मते घेतली. तायडे १३६८ मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे अरविंद राडे यांना केवळ १९३० मते मिळाल्याने काँग्रेसची परंपरागत व जोडलेली मते त्यांना मिळाली नाही. ही मते दुसरीकडे वळविण्यात आल्याची चर्चा मतदान काळात रंगली होती. घरात मोठे वडील स्व. डॉ. पुरुषोत्तम इंगोले, आई शुभम इंगोले हे दोन सदस्य जिल्हा परिषदेचे पाच-पाच वर्षे अध्यक्ष राहिले होते. तरी काँग्रेसचे तिकीट मिळाले नाही. म्हणून तृषित इंगोले यांनी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढविली. १००४ मते घेवून ते पडल्याने काँग्रेसला संकटात टाकले.
वाढोणाबाजार गणात प्रवीण कोकाटे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून ४२३५ मते घेतली. भाजपच्या ज्ञानेश्वर मांडवकर यांना ३७७३ मते मिळाली. ४६२ मतांनी त्यांचा पराभव झाला. धानोरा गणात भाजपच्या स्नेहा विजय येनोरकर यांनी ३३५४ मते घेतली. काँग्रेसच्या मंगला राजू ठाकरे यांना २७५४ मते मिळाली. ६०० मतांनी येथे काँग्रेसचा पराभव झाला. येथे काँग्रेसची उमेदवारी चुकल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती. त्यातच सीमा तेलंगे यांना जळका गटाची दिलेली उमेदवारी त्यांची निष्क्रिय कामगिरी, वादग्रस्त कारकिर्द, यजमान व भावाची कामात लुडबुड, ठेकेदारी, यवतमाळचे वास्तव्य, मतदारांशी संपर्क नसणे आदी बाबींचा फटका धानोरा व जळका येथे काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. जळक्यात माजी उपसभापती नलिनी पराते यांनाही त्यांची निष्क्रिय कामगिरी यजमानाची लुडबुड, बदललेला मतदारसंघ यांचा फटका बसला. त्यांना केवळ २०७७ मते मिळाली. भाजपच्या शीला मारोती सलाम यांना ३७५१ मते मिळाली व १६७४ इतक्या प्रचंड मतांनी विजय झाला.
वरधमध्ये काँग्रेसच्या ज्योती रवींद्र खैरकार यांनी २६२७ मते घेत २२८९ मते घेणाऱ्या भाजपच्या सीमा धोटेचा ३३८ मतांनी पराभव केला. वरधमध्ये काँग्रेसच्या नीलेश रोडे यांनी भाजपच्या रामकृष्ण आत्राम यांचा ६०४ मतांनी पराभव केला. कोलाम समाजाचे बाहुल्य रोडे यांना तारणारे ठरले. आता मतदारांचे लक्ष सभापती, उपसभापतीपद कुणाला मिळते याकडे लागले आहे.

Web Title: Ralegaon chairperson, Upasabhapati Ishwar Chitthite!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.