राळेगाव बाजार समितीचे शेतकरी हिताकडे दुर्लक्ष
By Admin | Published: November 15, 2015 01:44 AM2015-11-15T01:44:33+5:302015-11-15T01:44:33+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेतकऱ्यांनी या संस्थेकडे पाठ फिरविली आहे.
सेसचे नुकसान : कापूस व धान्याची होत आहे खुल्या बाजारात विक्री
राळेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेतकऱ्यांनी या संस्थेकडे पाठ फिरविली आहे. कापूस व धान्य खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात आहे. मात्र या प्रकारातही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
राळेगाव, वाढोणाबाजार, वडकी येथे खासगी व्यापाऱ्यांनी कापूस व धान्य खरेदी मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर, वजन आणि चुकाऱ्यात संरक्षण मिळणे कठीण झाले आहे. वजनात फसगत, कमी दर आणि वेळेवर पूर्ण पैसा मिळेलच याची खात्री उरलेली नाही. बाजार समितीत धान्य व कापूस खरेदी सुरू झाली असली तरी बाहेर सुरू असलेली अवैध खरेदी रोखण्यासाठी समितीने आजपर्यंत एकदाही, एकाही प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे खासगी खरेदीदारांचे चांगलेच फावले आहे. शिवाय या संस्थेचे सेसपोटी अतोनात नुकसान होत आहे.
बाजार समितीच्या मार्केट यार्डवर पणन आणि सीसीआयची खरेदी दिवाळीपूर्वी सुरू व्हावी यादृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे या काळात अनेकदा हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी झाली आहे. मार्केट यार्डवर कापसाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या जिनिंगमध्ये गाडी खाली करताना भाव कमी केला जात असल्याच्या तक्रारी राहिल्या आहे.
हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला, पण बाजार समितीने स्वत:चा मोठा धर्मकाटा अद्यापही दुरुस्त केला नाही. त्यामुळे कापूस वाहनाचे वजन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना वजनाची वेळीच शहानिशा करून घेणे अशक्य झाले आहे. बाजार समिती शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करत असल्याने आता सहकार विभागानेच या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबी मिळवून देण्यात याव्या, अशी मागणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)