राळेगाववासीयांच्या अपेक्षांवर फेरले पाणी
By admin | Published: June 15, 2014 11:48 PM2014-06-15T23:48:51+5:302014-06-15T23:48:51+5:30
पाणीटंचाईने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेने चार कोटी २९ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला. यात राळेगाव तालुक्याचा कृती आराखडा केवळ सात लाख चार हजार रुपयांचा आहे.
के.एस. वर्मा - राळेगाव
पाणीटंचाईने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेने चार कोटी २९ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला. यात राळेगाव तालुक्याचा कृती आराखडा केवळ सात लाख चार हजार रुपयांचा आहे.
पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यात जिल्ह्याच्या सर्व सोळाही तालुक्याचा विचार करता किमान १६ टक्के निधीची पाणीटंचाई कृती आराखड्यात तरतूद होईल, अशी अपेक्षा असताना झालेली तरतूद पावणेदोन टक्केही नाही. त्यामुळे राळेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागातील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तीन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, चार पंचायत समिती सदस्य, या भागातून भरपूर लीड मिळालेले खासदार, येथील आमदार विधानसभा उपाध्यक्ष असतानाही इतकी कमी तरतूद झाल्याबद्दल नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
राळेगाव शहरात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. येथे आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा होतो. काही ठोस पावले उचलण्यासाठी येथे भरपूर तरतूद आराखड्यात राहील, अशी अपेक्षा असताना केवळ दोन खासगी विहिरीच्या अधिग्रहणावर दोन लाख रुपये खर्चच आराखड्यात दर्शविण्यात आला आहे. सरासरी २७ लाख रुपयांची कामे प्रत्येक तालुक्यात अपेक्षित असताना येथे केवळ सात लाखांचा आराखडा दिल्याने २० लाखांची कामे कमी होणार आहे.
आता तर जून महिना सुरू झाला आहे. आगामी दिवसात पावसाळा सुरू होवून पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार आहे. पण प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मात्र या शहराची आणि तालुक्याची फार मोठी निराशा केली आहे.