रमाई आवास योजनेचे घरकूल रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 09:50 PM2018-10-14T21:50:49+5:302018-10-14T21:51:26+5:30
नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या रमाई आवास योजनेचे काम रखडल्याने लाभार्थी संतप्त झाले. त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊन निधीचे दोन हप्ते मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या रमाई आवास योजनेचे काम रखडल्याने लाभार्थी संतप्त झाले. त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊन निधीचे दोन हप्ते मिळाले. त्यांनी त्या पैशात आपले कुडामातीचे घर मोडून मिळालेल्या पैशात अर्धवट घरे उभी केली. दरम्यान, तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली. त्यानंतर नव्याने आलेल्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांनी जाचक अटी लावून कागदपत्रांची पूर्तता करा म्हणून लाभार्थ्यांना मिळणारा घरकुलाचा हप्ता रोखून धरला, असा आरोप आहे.
लाभार्थ्यांनी अर्ज, विनंत्या केल्या. पण उपयोग झाला नाही. आता कुडाचे घर मोडले गेले, निवारा गेला, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या विरोधात लाभाार्थ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला. तसेच मानसिक त्रास देऊन जेलमध्ये टाकण्याची धमकी देणाºया मुख्याधिकाऱ्याविरूद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली.
निवेदनावर रमेश शेंद्रे, नंदा हुमे, कमला पाटील, अशोक धनाडे, अनिता लोहकरे, गुलाब कलाणे, गंगाबाई मंत्रीवार, रमेश बिनझाडे, उषा कांबळे, गौतम कांबळे, द.वा. चहांद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, ठाणेदार, नगराध्यक्षांना पाठविण्यात आल्या.