पांढरकवडा येथे पहाटे दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:18 PM2018-04-22T22:18:05+5:302018-04-22T22:18:05+5:30
येथील शास्त्रीनगरातील एका घरी सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दीड लाख रुपये रोखेसह नऊ लाख रुपयांचे २४४ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील शास्त्रीनगरातील एका घरी सहा ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून दीड लाख रुपये रोखेसह नऊ लाख रुपयांचे २४४ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी पती-पत्नीला बेडरुममध्ये बांधून ठेवत तासभर घरात हैदोस घातला.
येथील उच्चभ्रू वस्ती असलेल्या शास्त्रीनगरात दिलीप मनोहर गंगशेट्टीवार यांचे घर आहे. येथे मोठा भाऊ राजू उर्फ किशोर आणि ते परिवारासह राहतात. इलेक्ट्रीकल्स वस्तू आणि बोअरवेलचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री त्यांची पत्नी अर्चना, मुलगा सोहम व भाचा हर्ष बासटवार बेडरुममध्ये झोपले होते. पहाटे २.३० वाजताच्या सुमारास चार दरोडेखोरांनी किचनचे लोखंडी ग्रील तोडून चौघांनी आत प्रवेश केला. स्वयंपाक घराच्या मागील लाकडी दार सबलीच्या सहाय्याने तोडले व बेडरुमचे दार आतून लावले नसल्याने सरळ आत प्रवेश केला. तोंडाला कापडाने बांधलेल्या दरोडेखोरांनी दिलीप व त्यांच्या पत्नीला उठविले. लाकडी दांडके उगारुन ‘चिल्ला ने का नही, साथ मे पेट्रोल लाये है, सब को जला देंगे, माल कहा है’ असे म्हटले. तसेच तेथे असलेल्या एका टॉवेलचे दोन तुकडे करून दोघांचे हात व तोंड बांधले. त्याच वेळी दिलीपच्या गळ्यातील सोन्याचे चेन, बोटातील अंगठी हिसकावून घेतली. तर पत्नी अर्चनाच्या कानातील एक दागिना काढला असता दरोडेखोराच्या म्होरक्याने साथीदाराला इंग्रजीत ‘डोन्ट टच कुल डाऊन’ असे म्हटले. त्यानंतर अर्चनाने भीतीने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील बिऱ्या, हातातील अंगठ्या आणि गोफ दरोडेखोरांच्या हवाली केला.
त्यानंतर लोखंडी कपाट फोडून त्यात दिलीपच्या वहिनी विद्या गंगशेट्टीवार यांच्या सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची पोत, बांगड्या, पाटल्या, टॉप्स्, बाळमुंडे असा सोन्याचा २४४ ग्रॅम ऐवज तसेच एक किलो वजनाचे चांदीचे ताट, चार वाट्या, एक गडवा तसेच कपाटातील रोख एक लाख २० हजार रुपये लंपास केले. एक तासभर हैदोस घातल्यानंतर दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर या दोघांनीही आपली सुटका करून घेतली. या प्रकाराची माहिती भाऊ राजू गंगशेट्टीवार यांना सांगितले. त्यानंतर पांढरकवडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतु थांगपत्ता लागला नव्हता. दरोडेखोर हिंदीतून बोलत होते. सहा ते सातच्या संख्येने असलेल्या दरोडेखोरांच्या हातात लाकडी दांडे व शस्त्रही होती. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दरोडेखोर पांढरकवडातील वाहनाने पसार
गंगशेट्टीवार यांच्या घराजवळ उभे असलेले मालवाहू वाहन घेऊन दरोडेखोर नागपूरमार्गे पसार झाल्याची माहिती डीवायएसपी अमोल कोळी यांनी दिली. सदर वाहनाचे लोकेशन वडनेर टोल नाक्यावरून मिळाले असून हे वाहन बेला या गावी टाकून चोरट्यांनी तेथून दुसरे वाहन पळवून नेले. या वाहनाने ते नागपूरकडे गेल्याचे त्यांनी सांगितले. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना झाली आहे.