पेन्शनसाठी आझाद मैदानात कर्मचाऱ्यांनी फुंकली रणदुदुंभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 05:00 AM2021-12-06T05:00:00+5:302021-12-06T05:00:06+5:30
राज्यात १ नोव्हेंबर २००५ या तारखेपासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत मृत्यू पावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही आर्थिक हातभाराशिवाय कसे तरी जगावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन (एनपीएस) या फसव्या योजनेच्या ऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी राज्यभरात पेन्शन संघर्ष यात्रा सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केवळ पाच वर्षे सभागृहात बसणारे आमदार-खासदार स्वत:साठी पाच मिनिटांत पेन्शन लागू करून घेतात. मात्र ३५ वर्षे जनतेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा हक्क देत नाही, असा संताप व्यक्त करीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी रविवारी येथील आझाद मैदानात शासनाविरुद्ध रणदुदुंभी फुंकली. जुनी पेन्शन योजना कोणत्याही परिस्थितीत लागू झालीच पाहिजे, या मागणीसाठी मुंबईमध्ये महामोर्चा काढण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
राज्यात १ नोव्हेंबर २००५ या तारखेपासून सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांत मृत्यू पावलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही आर्थिक हातभाराशिवाय कसे तरी जगावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन (एनपीएस) या फसव्या योजनेच्या ऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, अशी मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी राज्यभरात पेन्शन संघर्ष यात्रा सुरू केली आहे.
मुंबईच्या आझाद मैदानातून २२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे. राज्यातील २८ जिल्हे पालथे घालून रविवारी संघर्ष यात्रा यवतमाळात पोहोचली. नेर येथे कॉर्नर सभा आटोपून लोहारा आणि संविधान चौकात भेटी देऊन यात्रेचे संयोजक वितेश खांडेकर, प्राजक्त झावरे पाटील, निमंत्रक मधुकर काठोळे, मिलिंद सोळंके, आशुतोष चौधरी, गोविंद उगले आदींच्या पुढाकारात ही यात्रा आझाद मैदानात उभारलेल्या संत कबीर विचारमंचावर दाखल झाली. या वेळी झालेल्या जाहीर सभेला जिल्ह्यातील शंभरपेक्षा अधिक संघटनांचे सदस्य कर्मचारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, एकच मिशन जुनी पेन्शन, भीक नव्हे हक्क मागतोय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. एकच मिशन असे लिहिलेल्या टोप्या परिधान केलेल्या हजारो कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. गेल्या महिनाभरापासून घरदार सोडून जुन्या पेन्शनसाठी राज्यभर संघर्ष यात्रा काढत असलेल्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी ग्रामगीता आणि क्रांतिपत्र देऊन स्वागत करण्यात आले. यापुढील काळात प्रत्येक विभागातील कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारतील आणि मुंबईच्या अधिवेशनावर महामोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला. सभेचे प्रास्ताविक आंदोलन समिती प्रमुख नदीम पटेल, सूत्रसंचालन सुरेंद्र दाभाडकर, आभार श्याम दाभाडकर, यांनी मानले.
या पदाधिकाऱ्यांनी उठविला आवाज.. एकच मिशन
- संत कबीर विचारमंचावर उपस्थित असलेले वितेश खांडेकर, प्राजक्त झावरे पाटील, मधुकर काठोळे, राजूदास जाधव, मिलिंद सोळंके, अशोक जयसिंगपुरे, नंदकुमार बुटे, मंगेश वैद्य, दिवाकर राऊत, नदीम पटेल यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन कशी आवश्यक आहे, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गिरीष दाभाडकर, पप्पू पाटील भोयर, प्रवीण बहादे, सतीश काळे, संजय येवतकर, किरण मानकर, आसाराम चव्हाण, सिद्धार्थ भगत, विलास काळे, दीपिका येरंडे आदींची उपस्थिती होती.
दिवंगत कर्मचाऱ्यांचे नातेवाईक झाले भावूक
- कोणत्याही पेन्शनचा आधार नसलेले अनेक कर्मचारी गेल्या १५ वर्षात दगावले. अशा दिवंगत कर्मचाऱ्यांना जाहीर सभेत मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी नातेवाईकांची अवस्था रविवारच्या जाहीर सभेत अत्यंत भावूक झाली होती.
- जिल्हा परिषदेचे दिवंगत कर्मचारी गावंडे यांच्या पत्नी निता गावंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पतीच्या निधनामुळे आपल्या घराची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असून शासनाने पेन्शन लागू करावी, अशी विनंती केली.