रणरागिनींचा रुद्रावतार
By admin | Published: November 14, 2015 02:47 AM2015-11-14T02:47:34+5:302015-11-14T02:47:34+5:30
दारूच्या नशेत गावात अशांतता निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्यांचा डाव येथील दारूबंदी, व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या महिलांनी उधळून लावला.
दारूचा अड्डा उद्ध्वस्त : मांगलादेवी येथे मोहामाच आणि सडवा नष्ट
मांगलादेवी : दारूच्या नशेत गावात अशांतता निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्यांचा डाव येथील दारूबंदी, व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या महिलांनी उधळून लावला. दिवाळी सणाच्या दिवशी रणरागिनींचा हा रुद्रावतार संपूर्ण गावाला थक्क करून गेला. २० पिपे मोहामाच आणि ड्रम या महिलांनी उलटविले.
गावात विकल्या जाणाऱ्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. युवा पिढी दारूच्या आहारी जात आहे. एवढेच नव्हे तर शाळकरी मुलांचीही पावले तिकडे वळत आहे. हा गंभीर प्रकार थांबविण्यासाठी गावातील महिलांनी एकजूट केली आहे. दारू हद्दपार करण्यासाठी त्या एकत्र आल्या आहे. गावात होणारे लहानसहान तंटे, वाद होऊ नये यासाठी दारूबंदी-व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या महिलांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने दारूबंदी केली आहे. याला गावकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. तरीही काही लोकांकडून दारू काढण्याचे प्रकार सुरू आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात येवती-धामक रस्त्यावर मांगलादेवी शिवारात २० पिपे मोहाचा माच टाकला होता. दिवाळीच्या दिवशीच दारू गाळून पाडव्याच्या दिवशी गावात विक्री करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होता. परंतु समितीच्या सक्रिय महिलांना या बाबीची कुणकुण लागल्याने त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून याची खातरजमा केली. नेर पोलिसांनाही याची माहिती दिली. बीट जमादार राजेश चौधरी, महेश तडसे, रामधन आदी याठिकाणी दाखल झाले. मोहाचा माच असलेले वीसही पिपे रस्त्यावर आणून उबडून देत त्याची विल्हेवाट लावली.
यावेळी पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, दारूबंदी व्यसनमुक्त आंदोलन समितीच्या महिलांची उपस्थिती होती. (वार्ताहर)