सेनंद येथील युवकावर रानडुकराचा हल्ला
By admin | Published: May 19, 2017 01:56 AM2017-05-19T01:56:20+5:302017-05-19T01:56:20+5:30
यावर्षी उन्हाळा सध्या चांगलाच तापत असून, त्यामुळे जंगलांमधील जलसाठे हे कोरडे पडलेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : यावर्षी उन्हाळा सध्या चांगलाच तापत असून, त्यामुळे जंगलांमधील जलसाठे हे कोरडे पडलेले आहेत. वन्यप्राण्यांना जंगलात पाणीच मिळत नसल्याने ते पाण्याच्या शोधात शेतशिवारात व गावांकडे धाव घेत आहेत. अशातच शेतात गेलेल्या सेनंद येथील एका युवकावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यामुळे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
गोपाल जाधव (२१) असे रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. गोपाल शेतात काम करण्यासाइी गेला असताना पाठीमागून रानडुकराने अचानक त्याच्यावर हल्ला केला. बोटाला व अंगाला जोरदार चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या एका युवकाने आरडाओरडा केल्याने शेजारी असलेल्या शेतातील लोक धावून आले. त्यांनी कसेबसे गोपालला रानडुकराच्या तावडीतून सोडविले. आणि गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तालुक्यातील सेनंद या गावाला लागून चौफेर घनदाट जंगल आहे. या जंगलातील जलसाठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी जंगलात पानवठे त्वरित तयार करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून तीव्रतेने होताना दिसत आहे.