रविवारीही बँकांपुढे रांगाच रांगा
By admin | Published: November 14, 2016 12:48 AM2016-11-14T00:48:38+5:302016-11-14T00:48:38+5:30
५०० रुपये व हजाराच्या नोटाबंदीचा धसका घेतलेल्या नागरिकांनी रविवारीही नोटा बदलण्याकरिता सकाळपासून बँकांपुढे आणि एटीएममध्ये रांगा लावल्या.
मनपाला सव्वा दोन कोटी मिळाले : ३० कोटींची थकबाकी शिल्लक
चंद्रपूर : ५०० रुपये व हजाराच्या नोटाबंदीचा धसका घेतलेल्या नागरिकांनी रविवारीही नोटा बदलण्याकरिता सकाळपासून बँकांपुढे आणि एटीएममध्ये रांगा लावल्या. सुटीचा दिवस असल्याने इतर कामे बाजूला सारून नागरिक नवीन नोटा घेण्यासाठी बँकेत गेले होेते. तसेच नोटबंदीचा चंद्रपूर महानगरपालिकेला चांगलाच लाभ झाला आहे. मनपाच्या कर वसुली विभागाकडे नागरिकांनी केवळ चार दिवसांत २ कोटी २५ लाख रुपयांचा थकीत मालमत्ता कर भरला आहे.
मोदी सरकारने चार दिवसांपूर्वी ५०० रुपये व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. या नोटाबंदीमुळे नागरिक, कर्मचारी, वृद्ध आदी सर्वच कामाला लागले आहेत. नोटा बदलण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता बँकांपुढे रांगा लागत आहेत. एरवी रविवार हा नागरिकांसाठी सुटीचा दिवस असतो. त्या दिवशी अनेक जण घरची कामे आटोपून दिवस आराम घालवितात. परंतु हा रविवार नागरिकांसाठी नोटा बदल्याकरिता उपयुक्त ठरला. बँक उघडण्यापूर्वीच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. एटीएमपुढेदेखील सकाळपासूनच रांगा लागल्या. दिवसभर बँकांपुढे गर्दी होती. काही महिला लहान मुलांना सोबत घेऊन रांगेत उभ्या होत्या. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या गिरनार चौक मार्ग, मूल रोड येथील शाखांपुढे सर्वाधिक गर्दी होती. या बँकेत नोटा बदलण्याकरिता गिरनार चौकातील पेट्रोलपंपापुढे नागरिकांनी गर्दी केली. बँक आॅफ इंडिया, सिंडिकेट बँक, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांसह जिल्हा बँक, नागरी बँकांमध्येही नोटांसाठी गर्दी करण्यात आली होती.
बँकांपुढे रांग लावण्याचा त्रास वाचविण्याकरिता महावितरण कंपनी, मनपा, जलसंपदा विभाग आदींची थकबाकी चुकविण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे. या विभागांनी १४ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीची रक्कम जुन्या नोटांमध्ये स्वीकारण्याची घोषणा केली आहे. त्या सुविधेचा लाभ चंद्रपूर शहरातील नागरिकांनी घेतला आहे. महानगरपालिकेच्या मालमत्ता कराची वसुली गेल्या काही वर्षांपासून होत नाही. त्यामुळे दोन वर्षांत तब्बल ३८ कोटी रुपयांची थकबाकी झाली. अनेक युक्त्यांचा उपयोग करून ३८ कोटी रुपयांपैकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. त्यानंतर मनपाला आता थकबाकी वसुलीची सुवर्ण संधी नोटाबंदीमुळे आली आहे. त्या संधीचा लाभ घेत कर वसुली विभागाकडे नागरिकांनी चार दिवसांत २ कोटी २५ लाख रुपये भरले. शहरातील तीन झोनमध्ये ही थकबाकी जमा झाली आहे. त्यातील १ कोटी ९१ लाख रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले आहेत. रविवारी नागरिकांनी भरलेले २६ लाख रुपयांची रक्कम मनपाकडे आहे. जुन्या नोटा स्वीकारून मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी सोमवार १४ नोव्हेंबर रोजीही मनपा कार्यालय सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत ३१ लाख जमा
बल्लारपूर : बल्लारपूर नगरपालिकेने लोकांकडून कर शुक्रवारपासून स्वीकारणे सुरू केले. त्यावर भरपूर प्रतिसाद देत नागरिकांनी शनिवारच्या रात्री १२ वाजेपर्यंत करापोटी एकूण ३१ लाख रुपये जमा केले. व्यवहारातून बाद झालेल्या या नोटा कराच्या रुपाने घेणे सुरूच असून त्या सोमवार १४ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत, अशी माहिती न.प. मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
महावितरण व जलसंपदाचीही वसुली
जलसंपदा विभाग आणि महावितरण कंपनीनेही थकबाकी रक्कम भरण्याचे आवाहन केले. त्यालादेखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत वीज बिलाची अंदाजे साडेतीन कोटींची वसुली झाली आहे. चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली मंडळात ही वसुली करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या थकबाकी वसुलीचा रविवार हा पहिलाचा दिवस होता. जलसंपदा विभागाच्या थकीत पाणीपट्टीची वसुली सुरू करण्यात आली आहे.
ब्रह्मपुरीत थकबाकी विक्रमी वसुली
ब्रह्मपुरी : शासनाने वीज बिल, मालमत्ता कर भरून कराचा बोझा कमी करू शकता, असा आदेश काढल्याच्या दिवशीच २५ लाखाची विक्रमी वसुली नगरपालिकेत झाली. त्यामुळे सर्वाधिक फायदा नगरपालिकेला झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नगरपरिषद ब्रह्मपुरीने शहरात नागरिकांना शासनाच्या निर्णयाची माहिती देण्याकरिता शहरात तीन लाऊडस्पीकरवर ध्वनीक्षेपण करून नगरपरिषदेचा मालमत्ता कर व पाणी करासह इतर कराचा भरणा जुन्या ५०० व १००० रु. च्या नोटांनी करता येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार नागरिकांनी ११ नोव्हेंबर चे सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा जुन्या एक हजार व ५०० रुपयांच्या नोटाने स्वीकारला आहे. त्यात मालमत्ता करापोटी २१ लाख २४ हजार एकशे चौसष्ट रु. तर पाणीपट्टी करापोटी तिन लाख दहा हजार अशी एकूण २४ लाख ३५ हजार ७८ रूपयांची विक्रमी वसुली केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)