पैसे दे, नाही तर मुलाच्या पोस्टमार्टमची तयारी ठेव; फेक आयडीवरून धमकी देत खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2022 12:47 PM2022-06-09T12:47:20+5:302022-06-09T13:05:10+5:30
ही धमकी देण्यासाठी आरोपीने फेक फेसबुक आयडीचा वापर केला. ही घटना आर्णी शहरात घडली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ : समाज माध्यमांचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आतापर्यंत समाज माध्यमांवरून फसवणुकीचे काम होत होते. आता मात्र थेट मुलाचे अपहरण करून ठार करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. ही धमकी देण्यासाठी आरोपीने फेक फेसबुक आयडीचा वापर केला. ही घटना आर्णी शहरात घडली असून, सोमवारी उघडकीस आली.
धनेश प्रकाश देशमुख (रा. अशोक ले-आऊट, आर्णी) यांना त्यांच्या फेसबुक आयडीवर विनायक टाके नामक व्यक्तीने पोस्ट करीत तू आणि तुझ्या पोट्ट्याने मला शिवीगाळ केली, तू माझी तक्रार सायबर क्राईमकडे केली होती, आता तुझ्या पोराचा खून करतो, अशी धमकी दिली. तसेच फेसबुकवरील मित्रांच्या आयडीवर फिर्यादीला श्रद्धांजली अशा आशयाची पोस्ट केली. यानंतर लगेच आरोपीने विनय टाके नावाचे फेसबुक अकाऊंट बंद केले. नंतर आकाश गिरोलकर या नावाने अकाऊंट ओपन करून त्याने धनेश देशमुख याला दहा हजार रुपयांची मागणी केली. पैसे नाही दिले तर मुलाच्या पोस्टमार्टमची तयारी ठेव, अशी धमकी दिली. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८४ व ५०६ भादंविनुसार धमकाविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फेसबुक प्रोफाइलचे टू-स्टेप व्हेरिफिकेशन करा
समाज माध्यमांवर सध्या फेसबुकचा वापर सर्वाधिक आहे. आपल्या फेसबुक अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने टू-स्टेप व्हेरिफिकेशन करावे, जेणे करून सहज अकाऊंट हॅक होणार नाही. प्रोफाइलमधील फोटो लॉक करावे. इतकेच नव्हे, तर अनोळखी व्यक्तींना फ्रेन्ड लिस्टमध्ये घेऊ नये, संदिग्ध वाटल्यास संबंधिताला लगेच ब्लॉक करावे, ही सतर्कता पाळल्यास मानसिक त्रासापासून स्वत:ला वाचवू शकता येते, असे सायबर तज्ज्ञांनी सांगितले.