दुर्मीळ ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ आढळला यवतमाळात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:38+5:302021-02-07T07:50:27+5:30

राज्यात पहिलीच नोंद; चौसाळा जंगलात घेतली छायाचित्रे

Rare ‘black-winged cuckoo’ found in Yavatmal | दुर्मीळ ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ आढळला यवतमाळात

दुर्मीळ ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ आढळला यवतमाळात

Next

- अविनाश साबापुरे

यवतमाळ : विदर्भासह महाराष्ट्रात दुर्मीळ असलेला ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ हा पक्षी शनिवारी यवतमाळात आढळून आला. अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राणिशास्त्राचे प्राध्यापक डाॅ. प्रवीण जोशी यांनी ही नोंद घेतली.

शनिवारी सकाळी  नियमित पक्षीनिरीक्षणादरम्यान चौसाळा जंगल क्षेत्रात हा पक्षी आढळला. ‘आययूसीएन  रेड डेटा लिस्ट’नुसार त्याचा वावर मुबलक असला तरी महाराष्ट्रासाठी हा पक्षी दुर्मीळ आहे. ‘ई बर्ड’च्या वेबसाइटवर यापूर्वी नोंद नसलेल्या ‘ब्लॅक विंग्ड कुक्कुश्राइक’ अर्थात ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ याची विदर्भातील पहिली नोंद यवतमाळात डॉ. जोशी यांनी घेतली आहे. हा पक्षी  दक्षिण ते दक्षिणपूर्व आशियामध्ये सामान्यतः ईशान्य पाकिस्तानमधून खालच्या हिमालयी प्रदेशातून (उत्तरांचल, नेपाळ, अरुणाचल प्रदेश) आणि पूर्वोत्तर म्यानमारच्या टेकड्यांमध्ये, तसेच चीन आणि दक्षिणपूर्व आशियात आढळताे. ते हिवाळा हिमालयाच्या पायथ्याशी घालवतात. कधी-कधी लांब अंतर पार करतात केरळपर्यंत येतात. हा एक मध्यम आकाराचा, गडद काळा- पिसारा व संपूर्ण राखाडी रंगाचा पक्षी असून, पिसाऱ्याखाली धूसर असतो. डोळ्याभोवती पांढरी किनार ही या पक्ष्याची खास ओळख आहे. 

पक्षीनिरीक्षणादरम्यान अत्यंत उंच झाडे असलेल्या भागामध्ये सूर्यप्रकाश फारच कमी असताना अचानक लक्ष गेले तेव्हा या पक्ष्याची जोडी दिसली. नर उडाला; परंतु मादीचा लक्षात येण्याएवढा फोटो मिळाला.
- प्रा. डॉ. प्रवीण जोशी, प्राणिशास्त्र विभाग, अमोलचंद महाविद्यालय, यवतमाळ

चार वर्षांपूर्वीचे भाकीत खरे ठरले
पुणे येथील निनाद अभंग यांनी चार वर्षांपूर्वी ‘ई-बर्ड’च्या साहाय्याने या पक्ष्याच्या स्थलांतराचा एक नकाशा तयार केला होता. तेव्हा तो महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून जाऊ शकतो हेसुद्धा भाकीत केले होते. ते आज सत्य झाले. त्यांनीच आणि ‘बीएनएचएस’चे नंदकिशोर दुधे यांनीही या काळ्या पंखांचा कोकीळची माझ्यासोबतच पुष्टी केली, असे डॉ. जोशी म्हणाले. त्यांच्या मते यवतमाळातील ही नोंद विदर्भासाठी, तसेच महाराष्ट्रासाठीसुद्धा पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. 

Web Title: Rare ‘black-winged cuckoo’ found in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.