उपाध्यक्षपदासाठी नगरपरिषदेत रस्सीखेच
By Admin | Published: May 31, 2014 11:46 PM2014-05-31T23:46:39+5:302014-05-31T23:46:39+5:30
येथील नगराध्यक्षपदापेक्षा आता उपाध्यक्ष पदासाठी जादा रस्सीखेच सुरू झाली आहे. पुढील महिन्यात या दोनही पदांसाठी निवडणूक होत असल्याने अनेक जण गुडघ्याला बाशींग बांधून तयार झाले आहेत.
वणी : येथील नगराध्यक्षपदापेक्षा आता उपाध्यक्ष पदासाठी जादा रस्सीखेच सुरू झाली आहे. पुढील महिन्यात या दोनही पदांसाठी निवडणूक होत असल्याने अनेक जण गुडघ्याला बाशींग बांधून तयार झाले आहेत.
येथील २५ सदस्यीय नगरपरिषदेत सत्ताधारी गटाकडे तूर्तास बहुमत कायम आहे. पुढील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. २५ सदस्यांमध्ये विद्यमान सत्ताधारी गटाच्या अपक्ष नगरसेविका करुणा कांबळे आणि विरोधकांतर्फे मनसेच्या नगरसेविका प्रिया लभाने या दोनच महिला या प्रवर्गातील आहे. त्यामुळे या दोनपैकीच कुणीतरी एक नगरसेविका नगराध्यक्षपदावर विराजमान होणार आहे.
नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने आता उपाध्यक्षपदाकडे सर्वांचे डोळे लागले आहे. विद्यमान उपाध्यक्ष कैसर पटेल यांचीही मुदत संपणार असल्याने या पदावर नवीन चेहरा निवडला जाणार आहे. विद्यमान सत्ताधार्यांमध्ये राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचे तीन, कॉंग्रेसचे दोन, भाजपाचा एक तर चार अपक्षांचा समावेश आहे. विरोधात मनसेचे आठ आणि तीन अपक्ष नगरसेवक आहेत. सध्या नगराध्यक्षपद शिवसेनेकडे, तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसकडे आहे. काही अपक्ष सभापती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही सभापती पदे भूषविली आहेत.
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे उपाध्यक्ष पदासाठी प्रथमच प्रचंड चुरस निर्माण झाली. या पदावर अनेकांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधातील काही नगरसेवकांनाही उपाध्यक्षपद चांगलेच खुणावत आहे. हे पद पदरात पाडून घेण्यासाठी पडद्यामागील हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे. कोणत्या पद्दतीने आपण उपाध्यक्ष होऊ, याची चाचपणी केली जात आहे. या पदामुळे प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी आणि विरोधी दोनही बाजूचे नगरसेवक उपाध्यक्ष पदावर बसण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहे. त्यासाठी ‘जुगाड’ केले जात आहे. गणिते मांडली जात आहे. अमुकाने अर्ज केला, तर तमुक तसे करणार, आणि तमुकाने अर्ज भरला, तर अमुक असे करणार, याचे चित्र रंगविले जात आहे. दोन्ही बाजूकडील काही नगरसेवक या पदाच्या निवडीसाठी वेगवेगळे ‘डावपेच’ आखत आहे. त्यासाठी प्रसंगी फोडाफोडी करण्याची तयारीही सुरू झाली आहे.
मागील नगरपरिषदेच्या कार्यकाळात शेवटची अडीच वर्षे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी परस्परपूरक सत्ता चालविली. त्यात अनेकदा नगराध्यक्ष रजेवर असायचे. त्यामुळे उपाध्यक्षांकडे पदभार यायचा. त्या काळात अनेक महत्वाची कामे व्हायची. आताही तीच पद्धत राबविण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. यावेळी कुणीही नगराध्यक्ष झाले, तरी खरी चावी उपाध्यक्षांकडेच राहण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष केवळ नामधारी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने सत्ताधार्यांची पावले पडत असल्याने ही शक्यता आणखी बळावली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)