रेशनचे स्वस्त धान्य किराणा दुकानात

By admin | Published: November 21, 2015 02:55 AM2015-11-21T02:55:29+5:302015-11-21T02:55:29+5:30

परिसरातील परवानाधारकांकडून स्वस्त धान्याचा प्रचंड प्रमाणात काळा बाजार केला जात आहे.

Ration cheap grain grocery store | रेशनचे स्वस्त धान्य किराणा दुकानात

रेशनचे स्वस्त धान्य किराणा दुकानात

Next


वडकी : परिसरातील परवानाधारकांकडून स्वस्त धान्याचा प्रचंड प्रमाणात काळा बाजार केला जात आहे. गरिबांना त्यांच्या हक्काचे धान्य न देता ते किराणा दुकानात पोहोचत आहे. परिणामी अनेक रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित राहात आहे. पुरवठा विभागाकडूनही कठोर कारवाई होत नसल्याने धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे.
आदिवासी बहुल या परिसरातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा परवानाधारक उचलत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला धान्य न देता वडकीसारख्या मोठ्या गावामध्ये आणून किराणा दुकानात विकले जाते. आता शेतकऱ्यांसाठीही ही योजना सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी प्रती किलो, प्रती व्यक्ती पाच किलो याप्रमाणे धान्यपुरवठा केला जातो. यासाठी दर निश्चित करण्यात आले आहे. गहू दोन रुपये आणि तांदूळ तीन रुपये किलो याप्रमाणे दर आहे. मात्र काही परवानाधारक यापेक्षा जादा दर घेण्यासोबतच रेशनही कमी देत असल्याच्या तक्रारी आहे.
काही गावांचा धान्य पुरवठा एकाच व्यक्तीकडे आहे. अधिकाऱ्यांकडून अशा व्यक्तीवर कारवाई केली जात नाही. पुरवठा अधिकाऱ्याकडून धान्य दुकानांची तपासणी कधीही केली जात नाही. झाली तरी प्रत्यक्ष दुकानात पोहोचत नाही. परवानाधारकांनाच दस्तावेज घेऊन तालुक्याच्या ठिकाणी बोलाविले जाते. परवानाधारकाच्या सोयीनुसार नोंदी केल्या जातात.
रेशनचा काळा बाजार रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या दक्षता समित्याही कागदावरच आहे. या दक्षता समितीचा फलक कुठल्याही दुकानात लावण्यात आलेला नाही. समितीमध्ये कोण आहे, हे गावकऱ्यांनाही माहीत नाही. शिवाय दक्षता समितीकडूनही आपली जबाबदारी पार पाडली जात नाही. त्यामुळे रेशन परवानाधारकांची मनमानी सुरू आहे. पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन गरिबांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Ration cheap grain grocery store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.