पांढरकवड्यात रेशनचे धान्य खुल्या बाजारात, तांदूळ दहा रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:49 AM2021-09-24T04:49:10+5:302021-09-24T04:49:10+5:30
पांढरकवडा : शासन दारिद्र्य रेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्नपुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री करीत ...
पांढरकवडा : शासन दारिद्र्य रेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्नपुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री करीत असतात. काही लाभार्थी तांदूळ, तर काही लोक गहू विक्री करीत असतात. पांढरकवडा तालुक्यालगत तेलंगणा राज्य आहे. तेथील लोकांचा भात हा मुख्य आहार आहे. येथे रेशनचा तांदूळ जमा करून तेलंगणात जादा दराने विकला जातो. पोळीशिवाय राहणारे लाेक तांदळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे गहू शेजाऱ्या-पाजाऱ्यांना १० ते १५ रुपये किलोने विक्री करीत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लोक तांदळाचा वापर करतात त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते; परंतु गहू मिळत असल्याने गव्हाचा वापर करीत नाहीत. गव्हाच्या ठिकाणी ते तांदळाचाच वापर करतात. त्यामुळे रेशन दुकानातून मिळालेले २ रुपये किलोचा गहू १० ते १५ रुपये किलोने खुल्या बाजारातही विकला जातो. याशिवाय ओळखीच्या व्यक्तींनाही त्याची विक्री केली जाते. काही लोक गव्हाचा वापर करतात; परंतु ते तांदूळ दुसऱ्या लोकांना विक्री करतात. तांदूळ १० रुपये किलोने विकून मिळालेल्या पैशातून गहू खरेदी करतात. अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना महिन्याकाठी ३५ किलो रेशन मिळते. २५ किलो तांदूळ व १० किलो गहू मिळत असते. तांदूळ तीन रुपये, तर गहू दोन रुपये किलोने रेशन दुकानातून मिळत असतो. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप केले जाते. लाभार्थ्यांना धान्य वाटप केल्यानंतर त्याचे ते काय करतात, हे कुणालाही सांगता येत नाही. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किंवा नाही, याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून करणे गरजचे असून, ते होताना दिसत नाही.
बॉक्स : रेशनचे तांदूळ गोळा करणारी टोळी सक्रिय
गरीब व गरजू लाभार्थ्यांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ दिले जातात. यात तांदूळ लाभार्थ्यांकडून खरेदी करणारी टोळी तुमसर तालुक्यात व शहरात सक्रिय झाली आहे. ही टोळी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन तांदूळ १० ते १५ रुपये किलोप्रमाणे खरेदी करीत आहे. अनेक लाभार्थ्यांना तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून विनामूल्य मिळत आहे, तर काही लाभार्थ्यांना नाममात्र शुल्कात तांदूळ मिळतो. असा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. लाभार्थ्यांकडून शहर व गावात तांदूळ जमा करणारी टोळी ही ठोक भावाने विक्री करीत असल्याचे समजते. एका टोळीत दोन ते तीन लोक असून, ते १५० ते २०० किलोग्रॅम तांदूळ लाभार्थ्यांकडून गोळा करतात. त्यांना प्रति किलोग्रॅमवर तीन ते चार रुपये मिळतात. पुढे हा तांदूळ ठोक भावाने विक्री केला जातो; परंतु हा तांदूळ खरेदी करणारे कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे.
कोट : यासंदर्भात आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. यापूर्वी रेशनचे धान्य विकणाऱ्या दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर मात्र असा प्रकार कुठे उघडकीस आला नाही. असा प्रकार कुठे सुरू असेल, तर संबंधिताविरुद्ध कारवाई केली जाईल.
-भारती सोनट्टके, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पांढरकवडा