जिल्हा बँकेतील आघाडीसाठी पुन्हा तारीख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 09:34 PM2020-03-08T21:34:30+5:302020-03-08T21:35:18+5:30
महाविकास आघाडीच्या जागा वटप प्रक्रियेत काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, अॅड़ शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रसेकडून मनोहरराव नाईक, शिवेसनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा गटातील जागा वाटपावर कोणाचेच एकमत झाले नाही. पाच जागा असताना आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गणित जुळवताना नेत्यांच्या नाकीनऊ येत आहे. आघाडीसाठी रविवारी विश्रामगृहावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र यातून कोणताच निर्णय झाला नाही. आता ठोस निर्णयासाठी पुन्हा १४ मार्चला बसण्याचे ठरविण्यात आले.
महाविकास आघाडीच्या जागा वटप प्रक्रियेत काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, अॅड़ शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रसेकडून मनोहरराव नाईक, शिवेसनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा गटातील जागा वाटपावर कोणाचेच एकमत झाले नाही. पाच जागा असताना आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जागांवर दावा केला आहे. आता माघार कोण घेणार यावर आघाडीचे गणित आहे.
तालुका गटासाठी सर्वसाधारण फॉर्म्यूला ठरविण्यात आला आहे. ज्या उमेदवाराकडे मतदार अधिक त्यालाच महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी दिली जाणार आहे. याची जाहीर घोषणा झाली नसली तरी तसे संकेत या बैठकीतून देण्यात आले आहे. मारेगाव व कळंब तालुक्यात काँग्रेस व शिवसेनेच्या इच्छूकांमध्ये ‘टाय’ झाला आहे. मारेगावमध्ये शिवसेनेकडून संजय देरकर तर काँग्रेसकडून नरेंद्र ठाकरे दावा करत आहेत. कळंबमध्ये काँग्रेसकडून बाबू पाटील वानखेडे तर शिवसेनेकडून मोहन राठोड दावेदार आहेत. उमरखेडमध्ये प्रकाश पाटील देवसरकर आणि तातू देशमुख यांच्यात ‘टाय’ झाला आहे. हा पेच सोडविण्याचे आव्हान नेतेमंडळी पुढे आहे. जिल्हा गटात ३६ दावेदार रिंगणात आहेत. महिला गटात दोन जागांसाठी ३९ दावेदार आहे. नामांकन मागे घेण्याची प्रक्रिया १७ मार्चपासून सुरू होईल.
तिढा जाणीवपूर्वक कायम ठेवण्याचा फंडा
जागा वाटपाचा तिढा जाणीवपूर्वक कायम ठेऊन इच्छूकांचा पोळा फुटणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. हा छुपा अजेंडा असून तारीख पे तारीख करत बंडखोरीला वेळ मिळू नये, असा अजेंडा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच महाविकास आघाडीची नेतेमंडळी बैठकीचा रतीब घालत असल्याचे बोलले जात आहे. आता १४ मार्चच्या बैठकीतून काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे.