यवतमाळ शहरात कोरोनाची पुन्हा एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:00 AM2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:02+5:30

नेताजी चौक परिसरातील एका कॉम्पलेक्समध्ये वास्तव्याला असलेला ४५ वर्षीय इसम औरंगाबाद येथून परत आला. त्याला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होत होता. त्याने शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. डॉक्टरांना संशय आल्याने शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तपासणी केली असता तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

Re-entry of Corona in Yavatmal city | यवतमाळ शहरात कोरोनाची पुन्हा एन्ट्री

यवतमाळ शहरात कोरोनाची पुन्हा एन्ट्री

Next
ठळक मुद्देपॉझिटिव्ह रुग्ण : नेताजी मार्केट २८ दिवस बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात मागील तीन महिन्यांपासून नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येणे बंद झाले होते. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक शांत झाल्याने यंत्रणा व नागरिकांना दिलासा मिळाला होता. बुधवारी औरंगाबाद येथून आलेला इसम कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तो नेताजी चौक परिसरात वास्तव्याला असल्याने हा परिसर पूर्णत: सील केला आहे. शहरात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे.
नेताजी चौक परिसरातील एका कॉम्पलेक्समध्ये वास्तव्याला असलेला ४५ वर्षीय इसम औरंगाबाद येथून परत आला. त्याला सर्दी, ताप, खोकला याचा त्रास होत होता. त्याने शहरातील एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. डॉक्टरांना संशय आल्याने शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तपासणी केली असता तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर प्रशासनाने त्या कुटुंबातील नऊ सदस्यांना धामणगाव रोड स्थित कोविड सेंटरमध्ये हलविले आहे. या सर्वांचीही तपासणी केली जाणार आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट मार्केट परिसरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. नेताजी चौक ते संविधान चौक हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या भागातील बाजारपेठ पुढील २८ दिवस बंद राहणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना आवश्यक असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे यांनी सांगितले.
रुग्णांचा आकडा झाला २०१
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोनशेवर पोहोचला आहे. कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ४३ आहेत. त्यांच्यावर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू आहे.
दारव्हा येथील कोरोनाबाधित मृताच्या कुटुंबीयांचा यवतमाळातील शिंदेनगर भागातील काही नातेवाईकांशी संपर्क आला आहे. नगरपरिषदेने या संपर्काचा शोध घेतला असता तब्बल २१ जणांची यादी तयार झाली आहे. त्या मृताच्या पत्नीची गळाभेट घेतल्याने शिंदेनगरातील दोन कुटुंबांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास तपासणी करण्यात येणार आहे. शहरात नव्याने कोरोना संसर्गाची साखळी तयार होते का अशी भीती व्यक्त केली जात आहे. या दृष्टीकोनातून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.
अकोल्याच्या वृद्धाचा यवतमाळात कोरोनाने मृत्यू
कोरोना संसर्गाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी अकोला येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा यवतमाळातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना १५ जून रोजी दाखल करून व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र १७ जूनच्या रात्री त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या नऊ इतकी झाली आहे. रुग्ण उशिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचण्यास उशीर होत असल्याने येथील डॉक्टरांना उपचाराकरिता अवधी मिळत नाही. अनेक जण लक्षणे असूनसुद्धा प्रकृती अतिशय बिघडल्यानंतरच शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचा हा परिणाम आहे, असे सांगण्यात येते.
यवतमाळ शहरातील हा परिसर होणार सील
नेताजी चौक ते संत सेना चौक, संविधान चौक (बसस्थानक चौक), टीबी हॉस्पिटल, सूचकनगरपासूनचा परिसर सील केला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दुकाने येतात. प्रामुख्याने कापड, चप्पल, जनरल स्टोअर्स ही दुकाने आहेत. याशिवाय हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे वळण घेऊन वाहतूक सुरू राहणार आहे. पाचकंदील चौकातून, एलआयसी चौक व तेथून पुढे वाहनांना जावे लागणार आहे. या प्रतिबंधित भागात कृषी साहित्य विक्रेत्यांना दुकान उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. पेरणीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांसाठी हा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सांगण्यात आले.
 

Web Title: Re-entry of Corona in Yavatmal city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.