आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या समितीपुढे वाचला समस्यांचा पाढा; विद्यार्थी आंदोलनावर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 05:36 PM2021-11-13T17:36:54+5:302021-11-13T17:37:05+5:30
समितीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने मागण्या मांडल्या.
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या खुनानंतर संपूर्ण राज्यभर पडसाद उमटत आहे. यवतमाळ मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी उग्र आंदोलन सुरू केले आहे. याचीच दखल घेत आयुर्विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची चार सदस्यीय समिती शनिवारी दाखल झाली. या समितीपुढे विद्यार्थ्यांनी समस्यांचा पाढा वाचत समितीला मागण्या पूर्ण झाल्यानंतर आंदोलन थांबविण्याचे आश्वासन दिले.
आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानेटकर यांच्या निर्देशावरून चौकशी समिती गठित करण्यात आली. डॉ. विनीत बरठे, प्राचार्य डॉ. यशवंत राजपाल पाटील, डॉ. मंजुषा काळमेघ, कक्ष अधिकारी संदीप राठोड यांचा या समितीत समावेश आहे. समितीने यवतमाळ मेडिकलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा आढावा घेतला. नवीन प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र गवार्ले यांच्याशी चर्चा केली. यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
समितीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने मागण्या मांडल्या. घटनेच्या चार दिवसानंतरही मागण्यांची पूर्तता झाली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राज्यातील सर्व मेडिकल कालॅजेमध्ये सुरक्षिततेकडे लक्ष दिले जावे. सुरक्षा गार्ड देण्यात यावे, लाईट लावले जावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, परिसरातील झुडूप व झाडे तोडली जावी, यवतमाळ मेडिकलला पूर्ण वेळ डीन द्यावा, मेडिकलचे वसतिगृह व रुग्णालय हे वेगवेगळे केले जावे, वसतिगृह परिसरातच ग्रंथालय उपलब्ध करून द्यावे, सुरक्षा सुविधेच्या देखभालीसाठी पाच वर्षाचे कंत्राट काढावे. रुग्णालयामध्ये डॉक्टर्स रूम नाही, २४ तास काम करावे लागते. महिला डॉक्टर व पुरुष डॉक्टरांसाठी वेगवेगळ्या रुम द्याव, वसतिगृहांची नियमित सफाई व्हावी, एक्स-रे मशीन, सीसीटीव्हीचा इंजेक्टर बंद आहे. त्यामुळे डॉक्टरलाच एक्सपोजर घ्यावा लागतो. यातून रेडिएशनचा धोका आहे. त्यात सुधारणा करावी. रुग्णालयात वर्ग-४ व नर्सेसची पदे रिक्त आहे. याचा ताण डॉक्टरवर येतो, तातडीने ही पदभरती केली जावी, विद्यार्थ्यांना पैशासाठी टार्गेट केले जाते, अनेकांची हॉल तिकीट थांबविले होते. याचीही चौकशी केली जावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा अहवाल तयार करून तातडीने कुलगुरू व शासनाकडे पाठविला जाईल, असे समितीने सांगितले. यानंतर समितीने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मुला-मुलींच्या वसतिगृहांची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी अंतर्गत अडीअडचणी समितीपुढे मांडल्या.
डॉ. सुरेंद्र गवार्ले नवे अधिष्ठाता
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रभारी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर मागील दोन दिवस मेडिकल कॉलेजला डीनच नव्हते. त्यानंतर तातडीने वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या निर्देशावरून कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र गवार्ले यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा प्रभार देण्यात आला आहे. रुग्णालयाची यंत्रणा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज बाह्य रुग्ण तपासणी विभाग व अपघात कक्ष सुरू करण्यात आला. काही रुग्ण एका प्रवेशद्वारातून रुग्णालयात आले होते.